कर्तव्य पथावर ‘विकसित भारता’ची झलक

0
14

>> इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा

दिल्लीतील कर्तव्य पथावर काल देशाचा 75वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुसऱ्यांदा कर्तव्य पथावर तिरंगा फडकावला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि 13 हजार खास आमंत्रित हजर होते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची संकल्पना ‘विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी’ अशी होती.

सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी कर्तव्य पथावर पोहोचले. दुसरीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हेही कर्तव्य पथावर पोहोचले. 1984 नंतर प्रथमच राष्ट्रपती प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी बग्गीतून आल्या.

यानंतर शंख, ढोल आणि इतर पारंपरिक वाद्ये वाजवून 100 महिला वादकांनी संचलनाला सुरुवात केली. यावेळी 100 महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य सादर केले. हवाई दलाच्या 51 विमानांनी फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. यामध्ये 29 लढाऊ विमाने, 7 वाहतूक विमाने, 9 हेलिकॉप्टर आणि एका हेरिटेज विमानाचा समावेश होता. फ्रेंच लष्कराच्या राफेलनेही प्रथमच फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. याशिवाय तिन्ही दलांच्या जवानांनी विविध चित्तथरारक कवायती सादर केल्या. यानंतर विविध राज्यांचे चित्ररथ कर्तव्य पथावरून मार्गस्थ झाले. त्यात गोव्याच्या चित्ररथाचाही समावेश होता. तपलोका योग क्षेत्र, गोव्याचे सागरी जीवन यावर हा चित्ररथ आधारित होता.