- ज. अ. रेडकर
हक्क हे आपल्या वैयक्तिक फायद्याचे असतात, तर कर्तव्ये ही इतरांसाठी करायची असतात. आपण विसरून जातो की, आपले हक्क हे कुणाच्या तरी कर्तव्यातून मिळालेले असतात. मग अशावेळी आपले कर्तव्य म्हणजे त्या उपकारांची परतफेड नसते का?
व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढ्याच प्रवृत्ती असे म्हटले जाते. आयुष्यात असे विविध अनुभव आपणास सतत येत असतात. काहीवेळा आपण व्यक्तीच्या वागण्याने दिङ्मूढ होतो, तर कधी निराश! कधी राग येतो, तर कधी आश्चर्य! हक्क आणि कर्तव्य या नाण्याच्या दोन बाजू असतात. आपण हक्कासाठी जेवढे तत्पर असतो तेवढे कर्तव्याच्या बाबतीत असतो का? याचे उत्तर सामान्यतः ‘नाही’ असेच येते. याचे कारण हक्क हे आपल्या वैयक्तिक फायद्याचे असतात, तर कर्तव्ये ही इतरांसाठी करायची असतात. आपण विसरून जातो की, आपले हक्क हे कुणाच्या तरी कर्तव्यातून मिळालेले असतात. मग अशावेळी आपले कर्तव्य म्हणजे त्या उपकारांची परतफेड नसते का?
कर्तव्य हा जेव्हा आपला धर्म होईल तेव्हाच ही परिस्थिती बदलू शकेल. आज धर्म ही संकल्पना खूपच संकुचित अर्थाने घेतली जाते. निसर्गाने नेमून दिलेले काम व्यवस्थित निभावणे हा खरा धर्म असतो. समाजव्यवस्थेने नेमून दिलेले काम म्हणजे धर्म असतो. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेताना याचे धडे आपण गिरवतो, पण नंतर ते सहजपणे विसरून जातो. आमदार, खासदार निवडून आल्यावर जनसेवेची शपथ घेतात, पण प्रत्यक्षात तसे कितीसे वागतात हा प्रश्नच आहे. मिळालेल्या अधिकारांचा वापर आपला आणि आपल्या जवळच्या नातेवाइकांचा, इष्ट-मित्रांचा विकास करण्यासाठी केला जातो आणि ज्यांच्या मताधिक्यावर निवडून आलेले असतात त्या सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले जाते. आपण प्रशासकीय सेवेत प्रवेश करताना कर्तव्याची आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतो. पण पुढे तसे वागत नाही. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘रुग्णसेवा परमोधर्म’ अशी शपथ नव्याने डॉक्टर झालेले घेत असतात. पण व्यवसायात उतरले की त्यांना या शपथेचा विसर पडतो आणि ‘अर्थार्जन परमो धर्म’ वाटायला लागतो. शिक्षकी पेशात शिरताना विद्यादान हे पवित्र दान मानले जाते, पण शाळाबाह्य ट्युशन क्लास किंवा इतर जोडधंदे यांचे आकर्षण शिक्षकाला वाटू लागते. यामुळे मूळ कर्तव्याकडे त्याचे दुर्लक्ष होते. शिक्षक आणि डॉक्टर हे असे दोन व्यवसाय असे आहेत की समाज त्यांना देवाचा दर्जा देत असतो. एक माणूस घडवतो आणि दुसरा माणसाला दुर्धर आजारातून बरे करून नवसंजीवनी देत असतो. म्हणून शिक्षक आणि डॉक्टर हे नेहमीच वंदनीय वाटत असतात.
एक काळ खरोखरच असा होता की शिक्षक हा समाजासाठी आदर्श मानला जायचा. त्याला आदराची वागणूक मिळायची. त्याची तुलना प्रत्यक्ष देवाशी केली जायची. ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा’ अशी त्याची प्रार्थना केली जायची. डॉक्टरला साक्षात संजीवक मानले जायचे. आज हे दोन्ही व्यवसाय आपल्या वर्तणुकीने बदनाम झाले आहेत याचे प्रत्यंतर वारंवार येत असते. आमचे शेजारी बंडूकाका- वय वर्षे 75- हे सरकारच्या कृपेने नव्याने सुरू झालेल्या एका इस्पितळात आपली तब्येत दाखविण्यासाठी गेले होते. इस्पितळात ही गर्दी! बंडूकाकांचा नंबर लागेपर्यंत दुपारचा एक वाजला. इस्पितळाची जेवणाची वेळ झाली आणि डॉक्टर निघून जाऊ लागले. बंडूकाका म्हणाले, ‘डॉक्टर, मी एकटाच उरलो आहे, माझी तपासणी करा.’ यावर डॉक्टरांचे उत्तर चीड आणणारे होते. ‘आता जेवणाची वेळ झाली आहे, दुपारी अडीच वाजता या.’ यावर बंडूकाका विनवणीच्या स्वरात म्हणाले, ‘डॉक्टर, मी फार दुरून आलो आहे हो आणि शारीरिकदृष्ट्या इतका वेळ थांबणे मला शक्य होणार नाही.’ यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ती तरुण डॉक्टरीणबाई तडक निघून गेली. एका रोग्याला तपासण्यासाठी जास्तीत जास्त पाच-दहा मिनिटे लागली असती. पण तेवढाही वेळ द्यायला डॉक्टर केवळ लंच ब्रेकचे कारण देऊन रोग्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर आग लागो या वैद्यकीय पेशाला.
अशावेळी वैद्यकशास्त्राला स्मरून कर्तव्याची घेतलेली शपथ कुचकामी ठरते. शिक्षक किंवा डॉक्टर होण्यासाठी सरकारने फार मोठा खर्च केलेला असतो आणि हा पैसा जनतेने दिलेल्या विविध प्रकारच्या करांतून जमविलेला असतो. काहीजण म्हणतील की, डॉक्टरी शिक्षण घेण्यासाठी आम्ही मोठी फी भरलेली आहे, फुकट नाही शिकलो. पण वस्तुस्थिती अशी असते की, जेवढी फी भरलेली असते त्यापेक्षा कितीतरी पटीने खर्च शिक्षण व्यवस्थेवर सरकार करीत असते आणि तो सर्व पैसा जनतेने भरलेल्या करातून केलेला असतो, हे कुणाच्या लक्षात येत नाही. तेव्हा वैद्यकीय सेवा ही जनतेच्या उपकाराची परतफेड असते.
वैद्यकीय शिक्षणासाठी केलेला खर्च वसूल करण्यासाठी बरेच डॉक्टर जबरदस्त फी घेतात. एखाद्या पंचतारांकित इस्पितळाची फी कोणत्याही सामान्य रुग्णाला परवडणारी नसते. सामान्य माणसाला जीव वाचवण्यासाठी तिकडे जायचे असेल तर घरदार विकूनच जावे लागेल. इतकेच काय तर काही इस्पितळे संपूर्ण फी भरल्याशिवाय मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देत नाहीत. मृतदेहापेक्षा पैसा श्रेष्ठ वाटणे हा माणुसकीला कलंक आहे. डॉक्टरी पेशा हा सेवाभावी व्रत न राहता आता तो अतोनात पैसा कमावणारा धंदा झाला आहे. औषध विक्रेते आणि पॅथॉलॉजी केंद्रे यांच्याशी त्यांचे लागेबांधे असतात. त्यातूनही यांना आर्थिक लाभ होत असतो हे लपून राहिलेले नाही. कर्तव्याची दीक्षा फोल ठरते आहे एवढे मात्र खरे!