- माधुरी रं. शे. उसगावकर
प्राण पणाला लावून राष्ट्रसेवेची गुढी उभारताना लोकमान्य टिळकांनी आपला देह झिजविला. ना कुटुंबाची तमा ना राज्यकर्त्यांची भीती. लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांचा आत्मविश्वास वाढविणार्या तपस्व्याला कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या असामान्य कार्याची जागृती होणे हीच खरी श्रद्धांजली.
आज १ ऑगस्ट २०२०. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीची शताब्दी! १०० वर्षांपूर्वी ‘असंतोषाचे जनक’ म्हणून दबदबा असणार्या या महापुरुषाची प्राणज्योत मालवली आणि देशाचा कणाच मोडून पडला. आपल्या पूर्ण आयुष्यात देशसेवा हेच उद्दिष्ट ठेवून ते सतत कार्यरत राहिले. त्यांच्या कार्याची महती जाणून घेता चंदनाच्या वृक्षालाही लाजवेल असेच त्यांचे देशकार्य होते. प्राण पणाला लावून राष्ट्रसेवेची गुढी उभारताना त्यांनी आपला देह झिजविला. ना कुटुंबाची तमा ना राज्यकर्त्यांची भीती.
माझ्या शालेय जीवनात लो. टिळकांच्या जीवनात घडलेल्या विविध घटना, प्रसंग शिक्षक सांगायचे. शेंगदाण्याच्या टरफलांची घटना, शरीरसौष्ठवासाठी व्यायामाचा सराव, पोहणे हे सर्व कथात्मक रूपात ऐकताना मन भारावून जायचे. तसेच माझ्या वडिलांनी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित छोटी छोटी पुस्तकं माझ्याकडून वाचून घेतली. शंकानिरसनही होत होते. भगवती विद्यालय- पेडणे या विद्यालयात टिळकांवर खुल्या गटात वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जात. एकदा या स्पर्धेतही माझ्या पिताश्रींनी मला सहभागी केले. महापुरुषाच्या कार्याने माझे बालमन प्रभावित झाले. त्यांची तेजस्वी, करारी, आदरयुक्त प्रतिमा माझ्या मनात ठसली.
उत्तरोत्तर टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक एक पैलू उलगडताना वेळकाळाचेही भान हरपू लागले. कॉलेजजीवनात सवड काढून टिळकांच्या जीवनावर आधारित पुस्तकं वाचण्याचा मी सपाटाच लावला.
आज आपला देश कोरोना महामारीच्या आपत्तीत भरडला जात आहे. राज्यात कोविड विषाणूने तर हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीत या राष्ट्रवीर महापुरुषाच्या जीवनातील कठोर प्रसंग आठवला.
सन १८९६मध्ये महाराष्ट्रात महाभयंकर प्लेगची साथ पसरली. सामाजिक, राजकीय इतिहासात उलथापालथ झाली. प्लेगच्या आजाराने जनजीवन विस्कळीत झाले. साथीच्या फैलावाची मूळ कारणे शोधण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयास चालूच होता.
टिळकांच्या अंगी देशभक्ती, शिस्त, धैर्य, एकात्मता बाणली होती. प्लेगच्या साथीत त्यांचा मुलगा आजारी होता. त्याच वेळेस ‘केसरी’चा लेख दिल्याशिवाय अंक निघणार नव्हता. म्हणून त्यांना जाणे भाग होते. त्यांच्या पत्नीने त्यांना थांबण्याविषयी नाना परीने सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘तुम्ही व डॉक्टर त्याची काळजी घ्यायला आहात. अग्रलेख देणे हे तितकेच महत्त्वाचे आहे’’, असे सांगून कर्तव्यनिष्ठ टिळकांनी कर्तव्य श्रेष्ठ मानले.
आजच्या या कोरोनाग्रस्त परिस्थितीत आजारी पडणे म्हणजे एक मोठे संकटच झाले आहे. (कोरोनाबाधितांची सेवा सरकारी रुग्णालयात उत्तम प्रकारे केली जात आहे, यात दुमत नाही). खाजगी दवाखान्यात मुख्य डॉक्टर्स उपस्थित नसतात. (अपवाद सोडल्यास) कुणीतरी शिकाऊ डॉक्टर्स किंवा स्वतंत्र अननुभवी नेमतात आणि रुग्णांची चाचणी केली जाते. तात्पुरता इलाज केला जातो व स्वतः नामानिराळे होतात.
या बिकट परिस्थितीत दूरदृष्टी असलेल्या टिळकांच्या कर्तव्यनिष्ठेच्या प्रसंगांची आठवण येऊन कृतज्ञतेने ऊर भरून येतो. देशसेवा हेच त्यांचे अंतिम लक्ष्य होते. उभे आयुष्य त्यांनी राष्ट्रकार्यात वेचले. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’’ अशी सिंहगर्जना करणारा तो सिंहच होता. राष्ट्राची अविरत सेवा करता करता या नभी रंगउगवत्या सूर्याचा १ ऑगस्ट १९२० रोजी अस्त झाला तो कायमचाच. थकून गेलेले त्यांचे शरीर अवनी मातेच्या मांडीवर शांत झोपले ते अखेरचेच!
लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांचा आत्मविश्वास वाढविणार्या तपस्व्याला कोटी कोटी प्रणाम! त्यांच्या असामान्य कार्याची जागृती होणे हीच खरी श्रद्धांजली. त्रिवार वंदन!