करावे तसे भरावे

0
5

सव्वीस भारतीय पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या, त्या बैसरान दहशतवादी हल्ल्याला बघता बघता आठ दिवस पूर्ण झाले. ह्या आठ दिवसांत त्या हल्ल्यात सामील झालेला एकही दहशतवादी सापडलेला नाही. मात्र, काश्मीर खोऱ्यातील त्यांची घरे शोधून शोधून उद्ध्वस्त करण्यात आली. इतकेच नव्हे, तर दहशतवादाची पाठराखण करीत आलेल्या पाकिस्तानला कोणत्याही क्षणी अभूतपूर्व अशा स्वरूपाचा एखादा दणका देण्याच्या मनःस्थितीत आणि तयारीत आज भारत दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच्या उरी आणि पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देऊन भारतीयांच्या अपेक्षा एवढ्या उंचावून ठेवल्या आहेत, की ह्यावेळी त्याहून कडवे प्रत्युत्तर देणारे पाऊल जर भारताने उचलले, तर युद्ध अटळ असेल. तरीही भारताने ती तयारी ठेवून बैसरानचा बदला घेण्याच्या दिशेने सज्जता ठेवलेली दिसते. मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध जलास्त्र उचलले. साठच्या दशकातला आणि चार युद्धे होऊनही टिकलेला सिंधू जल करार संस्थगित करून भारताने पाणी हेही अस्त्र होऊ शकते हे दाखवून दिले. अर्थात, हा उपाय वेळकाढू स्वरूपाचा आणि आंतरराष्ट्रीय तंटा उपस्थित करणारा आहे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नसल्याचा इशारा जलशक्ती मंत्र्यांनी दिला आहे. हे साध्य करायचे असेल तर भारताला सिंधू नदीच्या पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करून ते इतरत्र वळवावे लागेल. त्यासाठी धरणांची उंची वाढवावी लागेल, कालवे खोदावे लागतील, परंतु हा दीर्घकालीक उपाय झाला. बाकी, पाकिस्तानच्या भारतात आलेल्या नागरिकांची तात्काळ परत पाठवणी, व्हिसा सवलत रद्द, दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात वगैरे वगैरे उपायांद्वारे भारताने आपली कडवी नापसंती दर्शवली आहेच. परंतु हे सगळे राजनैतिक उपाय झाले. लष्करी उपाययोजनाही करण्यास भारत मागेपुढे पाहणार नाही हे संरक्षण दलप्रमुखांना पंतप्रधानांनी दिलेल्या मुक्तहस्तातून स्पष्ट झाले आहे. बैसरानचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानला कुठे, कधी आणि कसा दणका द्यायचा ह्यासंबंधी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिन्ही सैन्यदलांना देण्यात आलेले आहे. ह्यामुळे पाकिस्तान कमालीचा धास्तावला आहे. गुप्तचरांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, येत्या चोवीस ते छत्तीस तासांत भारत हल्ला चढवील ही भीती पाकिस्तानच्या एका मंत्र्याने पहाटे दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली त्यातच सारे आले. दुसरीकडे उभय देशांच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्तानकडून गेला आठवडाभर सातत्याने गोळीबार चालला आहे. पाकिस्तानने सिमला करार संस्थगित करण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न जुमानता जणू काही आपण भारतीय प्रदेशात चढाई करू शकतो असा इशाराच पाकिस्तानने दिला आहे. त्यामुळे आपल्या काश्मीरवर आक्रमण करण्याची तयारी पाकिस्तानने ठेवलेली असू शकते. ह्या अशा शक्यतांचा विचार करूनच भारताला आपली रणनीती आखावी लागणार आहे. परंतु काही तरी कडवे प्रत्युत्तर दिल्यावाचून भारतापुढे पर्यायही नाही. पाकिस्तानने भारताच्या अनेक शत्रूंना आपल्या पदराखाली सुरक्षित ठेवले आहे. भारतातील बॉम्बस्फोटमालिकेतील सूत्रधार असो, कंदाहार विमान अपहरणनाट्यातील सूत्रधार असो, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार असो, हे सगळे पाकिस्तानच्या आयएसआयच्या पदराखाली सुखाने राहत आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा आसरा नेस्तनाबूत करण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे. पाकिस्तान भले बैसरान हल्ल्याशी आपला काही संबंधच नसल्याचे दर्शवीत असला तरी हल्लेखोर पाक लष्कर प्रशिक्षित असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश असल्याचा बागुलबुवा काही महाभाग उभा करीत आहेत. पाकिस्तानला ह्यापूर्वी दोन वेळा धडा शिकवला गेला, तेव्हाही तो अण्वस्त्रधारी देशच होता, परंतु अण्वस्त्रांचा बेछूट वापर करता येत नाही. पाकिस्तानला एवढी समज निश्चित आहे. पाकिस्तानला आजच्या स्थितीत युद्ध परवडणारे नाही हेही लक्षात घेणे जरूरी आहे. युद्ध भडकले तर ते चालेल तेवढे दिवस सुरू ठेवण्यासाठी लागणारे आर्थिक बळ पाकिस्तानपाशी नाही. अंतर्गत विद्रोहाने पाकिस्तान आधीच होरपळतो आहे. गिलगिट बाल्टिस्तान, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वामध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरू लागली आहे. ह्या सगळ्या यादवीजन्य परिस्थितीमध्ये भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला फार महाग पडू शकते. पाकिस्तानला हे सगळे ठाऊक नाही असे नव्हे, परंतु आता भारताची कुरापत काढली गेली आहे. परिणाम अटळ आहे.