वर्षभरात 25 दिवसही कामकाज होत नसल्याची टीका
गोवा विधानसभा अधिवेशनाचे कामकाज वर्षभरात 25 दिवसही होत नाही ही चिंतेची व लोकशाहीसाठी धोक्याची बाब असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण झाली, त्यावर्षी विधानसभेत एक ठराव घेऊन दरवर्षी विधानसभा अधिवेशन हे किमान 50 दिवस भरवण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र, आता वर्षाला 25 दिवसही अधिवेशन भरत नसून हे लोकशाहीसाठी धोक्याचे असल्याचे सरदेसाई म्हणाले.
या घडीला सत्ताधारी भाजपकडे 33 आमदारांचे संख्याबळ आहे. तर विरोधकांचे संख्याबळ हे अवघे 7 आहे. असे असतानाही सरकार का घाबरत आहे ते कळत नाही. आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याचे बोलले जात असून मंत्रिमंडळातील 50 टक्के सदस्य हे निष्क्रिय असल्याचे सरकार पक्षातील सूत्रांकडूनच सांगितले जाऊ लागले आहे. काही मंत्री हे अहंकारी आहेत, काही मंत्री हे खात्याचा अभ्यास करीत नाहीत असे सांगितले जात असून 6 मंत्र्यांना बदलून मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचा घाट घातला जात असल्याचे सरदेसाई म्हणाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात केवळ अर्थसंकल्प मांडला जातो आणि त्यावरील चर्चा ही पावसाळी अधिवेशनात ठेवली जाते. हिवाळी अधिवेशनात सभापतींचे अभिभाषण होते. मात्र, त्या अभिभाषणाला उत्तर देऊन त्यावर दुरुस्ती मांडणे हेही पुढच्या अधिवेशनासाठी पुढे ढकलले जाते ही पद्धत अत्यंत चुकीची असून ही लोकशाहीची हत्या असल्याचे सरदेसाई म्हणाले.
मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना ही पद्धत सुरू झाली होती. मात्र, त्याला तसे विशिष्ट असे कारण होते. पर्रीकर हे त्यावेळी कर्करोगासारख्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे तेव्हा नाईलाजाने ही पद्धत सुरू करावी लागली होती. आता तशी परिस्थिती ओढवलेली नसतानाही सरकार हे का करीत आहे, असा सवाल सरदेसाई यांनी केला.