गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत होणाऱ्या कनिष्ठ कारकून पदांच्या 232 जागांसाठी हजारो उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची सात टप्प्यात संगणक आधारित परीक्षा (सीबीटी) घेतली जाणार आहे. या कारकून पदासाठी 11 जानेवारी, 12 जानेवारी, 18 जानेवारी, 19 जानेवारी, 25 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी 2025 अशा सात टप्प्यांत परीक्षा घेतली जाणार आहे.
गोवा कर्मचारी निवड आयोगाने गेल्या 21 नोव्हेंबर 2024 रोजी सरकारी खात्यांतील 232 कनिष्ठ कारकून आणि 53 स्टेनोग्राफर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या दोन्ही पदांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. कनिष्ठ कारकून पदासाठी 20 हजारांच्यावर उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. त्यामुळे परीक्षा सात टप्प्यात घ्यावी लागत आहे. उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण आणि वेळ यांची माहिती ई-मेलद्वारे कळविली जाणार आहे.