कदंब महामंडळाकडे बसेसचा तुटवडा

0
8

>> वाहतूकमंत्री; केंद्राच्या धोरणामुळे 150 बसेस भंगारात

15 वर्षे पूर्ण केलेल्या जुन्या बसेस भंगारात काढण्याबाबत केंद्र सरकारच्या धोरणामुळे कदंब महामंडळाच्या ताफ्यातील सुमारे 150 बसेस सेवेतून काढून टाकाव्या लागल्याने कदंब महामंडळाला बसेसचा तुटवडा जाणवू लागला आहे, अशी माहिती काल वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल गोवा विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिली.

बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी आपल्या मतदारसंघातील विद्यार्थ्यांना विद्यालये व महाविद्यालयात जाण्यासाठी मोबर ते मडगाव व परत अशा प्रवास करणाऱ्या कदंब बसेस हव्या असून, ह्या बसेस महामंडळाने या मार्गावर सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी बोलताना गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

शक्य होईल तशा या मार्गावर बसेस सुरू करण्याचे आश्वासन देतानाच राज्यातील विविध भागांतून कदंब बसेससाठी मागणी वाढू लागली असल्याचे वाहतूकमंत्र्यांनी सांगितले. सत्तरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनाही बसेसअभावी फार त्रास सहन करावे लागत असल्याचे ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर कदंब महामंडळाने खासगी बसमालकांकडून त्यांच्या बसेस भाडेपट्टीवर घेण्याची योजना सुुरू केली असल्याची माहिती गुदिन्हो यांनी दिली. त्याचबरोबर लवकरच महामंडळ डिझेलवर चालणाऱ्या 50 नव्या बसेस खरेदी करणार आहेत. त्याशिवाय नंतर आणखी 121 बसेसही खरेदी करण्यात येणार असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले.