>> एक गंभीर : बेफाम वेगामुळे अपघात
पणजी ते ओल्ड गोवा या बगलमार्गावर काल दुपारी २.३० च्या सुमारास आयआरबी पोलीस वसाहतीजवळ रायचूर कर्नाटकातील पर्यटकांच्या भरधाव कारगाडीने लोखंडी संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारगाडीतील एक पर्यटक ठार झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
रायचूर कर्नाटक येथील पाच युवक कारगाडी घेऊन गोव्यात फिरायला आले होते. पणजी ते ओल्ड गोवा या महामार्गावरून कर्नाटकात परत जात असताना आयआरबी पोलीस वसाहतीजवळ कारगाडीच्या चालकाचा कारगाडीवरील ताबा सुटल्याने कारगाडीने लोखंडी संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली. कारगाडी भरधाव असल्याने रस्त्याकडेच्या पाच लोखंडी खांबांना धडक देऊन कारगाडी स्थिरावली. लोखंडी खांबांना जोडलेली लोखंडी प्लेट कारगाडीच्या समोरील काचेतून आतमध्ये घुसून मागील काचेतून बाहेर पडली. कारगाडीमध्ये लोखंडी प्लेट घुसल्याने कारगाडीतील बावासाहेब बुवाजी (२३) आणि मेहबूब पाशा (२३) हे दोघे पर्यटक गंभीर जखमी झाले. दोघांना त्वरित बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बावासाहेब बुवाजी याचे निधन झाले. कारगाडीतील कासिम अली, रवीचंद्र घुचेदार आणि महंमद बुरहान हे तिघे बचावले आहेत. जखमी मेहबूब यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, या प्रकरणी कारचालक कासीन अली यांच्याविरोधात बेशिस्त व निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.