>>आपेव्हाळ-प्रियोळ येथील घटना; एक महिला गंभीर
फोंड्याहून वळवईला निघालेल्या कदंब बसचा आपेव्हाळ-प्रियोळ येथील मार्गावर काल सकाळी ८.४५ वाजता अपघात झाला. या अपघातात चौघेजण जखमी झाले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला उपचारार्थ बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात तातडीने हलविण्यात आले आहे.
सविस्तर माहितीनुसार, फोंड्याहून वळवईला जाणार्या कदंब बसमध्ये सहा प्रवासी होते. आपेव्हाळ येथे बस पोहोचल्यावर अचानकपणे आडव्या आलेल्या गुरांमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या बाहेर गेली. बसची जोरदार धडक संरक्षक कुंपणालाबसली आणि त्यानंतर ही बस गटारात एका बाजूने कलंडली. तसेच वीज खांबाला देखील धडक बसल्याने बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात धनश्री नाईक (वय ३०, रा. आडपई-दुर्भाट), मेघन सावंत (वय ५२, रा. केपे), बसवाहक सुषमा गावडे (वय ४२, रा. तामसुली-खांडोळा) व बसचालक प्रकाश साळुंखे (वय ३२) हे जखमी झाले. त्यातील धनश्री नाईक यांना जबर मार बसल्याने त्यांना बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून, उर्वरित तिघांना प्राथमिक उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला.