कदंब कर्मचार्‍यांनी संयम बाळगण्याची गरज : आल्मेदा

0
97

बोनसची अपेक्षा करू नये
कदंब कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यात येणार असून त्यांनी थोडा संयम बाळगण्याची गरज आहे, असे कदंबचे चेअरमन आमदार कार्लुस आल्मेदा यांनी काल सांगितले. मात्र, त्याचबरोबर कदंब महामंडळ नुकसानीत चालत असल्याने कर्मचार्‍यांनी बोनसची अपेक्षा करू नये, असे आल्मेदा म्हणाले. कदंब महामंडळ नुकसानीत असतानाही महामंडळाने कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर नेहमीच सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहेत.
या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांनी येत्या २८ पासून बेमुदत संपावर जाण्याचा जो इशारा दिलेला आहे तो धक्कादायक असल्याचे आल्मेदा यांनी स्पष्ट केले. येत्या २९ पासून होणार्‍या गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर महामंडळाने कर्मचार्‍यांना आगाऊ रक्कम देऊन त्यांची सोय केलेली आहे. कदंब महामंडळाचे २ हजार पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारावर दरमहा सुमारे ५ कोटी रु. एवढा खर्च येत आहे. कदंबचे ड्रायव्हर व कंडक्टर्स यांना सुमारे ३५ हजारांच्या आसपास पगार आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्यात आल्याने अन्य कर्मचार्‍यांचा पगारही आता बराच वाढलेला आहे. त्यामुळे त्यांचा अगदीच संयम सुटावा अशी स्थिती नाही, असे सांगून कर्मचार्‍यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सावधपणे पावले टाकावीत, अशी सूचना आल्मेदा यांनी केली आहे.