कदंबही कॅशलेसच्या दिशेने

0
70

गोवा सरकारने कॅशलेस इकॉनॉमी सुरू करण्याची जी योजना आखली आहे त्या पार्श्‍वभूमीवर कदंब महामंडळाने आपला सगळा व्यवहार कॅशलेस करण्यासाठीची तयारी जोरात सुरू केली आहे, असे महामंडळाचे चेअरमन आमदार कार्लुस आल्मेदा यानी काल सांगितले.

यापुढे कदंब महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांसह रोख व्यवहार करावे लागू नयेत यासाठीची तयारी महामंडळ करीत असल्याचे कार्लुस म्हणाले. त्यासाठी काय काय करता येईल यावर चर्चा सुरू आहे. अधिकार्‍यांच्या बैठकाही घेण्यात येणार असल्याची माहिती आल्मेदा यांनी दिली. कार्ड स्वाईप, एकाच वेळा कार्ड विकत घेणे अशा काही गोष्टी कॅशलेससाठी अमलात आणण्यात येणार असल्याचे आल्मेदा म्हणाले.
मडगांव-काणकोणचा प्रस्ताव
दरम्यान, मडगांव काणकोण मार्गावरील खासगी बसेस् चालवण्याचा कदंब महामंडळाचा जो प्रस्ताव होता तो महिनाभराच्या काळात सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याची माहितीही आल्मेदा यानी दिली. सध्या मडगांव-काणकोण मार्गावर कदंब महामंडळाच्या बसेस्‌सह एकूण ८० बसेस आहेत ही संख्या खूप जास्त असून आम्ही खासगी बसेस् चालवायला घेतल्यानंतर त्या मार्गावरील कदंब बसगाड्या मागे घेणार असून त्या अन्य मार्गांवर घालण्यात येतील या मार्गावरील खासगी बसवाल्यांमध्ये प्रवाशांसाठी जी स्पर्धा चालू आहे तोही आम्ही खासगी बसेस् चालवण्यास घेतल्यानंतर बंद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मडगांव-काणकोण प्रस्ताव यशस्वी झाल्यास वास्को-बिर्ला व मडगांवग-कुडचडे या मार्गावरील खासगी बसेस्‌ही कदंब महामंडळ चालवण्यास घेणार असल्याचे आल्मेदा यांनी सांगितले.