कदंब वाहतूक महामंडळाने चोवीस तास प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल कदंब महामंडळाच्या ३९ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना केले.
यावेळी वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, महापौर उदय मडकईकर, मंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा व इतरांची उपस्थिती होती.
कदंब महामंडळाला ५० इलेक्ट्रिक बसगाड्या लवकरच मिळणार आहेत. राज्यातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी हरीत बसगाड्यांची नितांत गरज आहे. या नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांमुळे कदंब महामंडळाने आपल्या बस तिकीट दरात थोडीशी वाढ केल्यास नागरिकांनी सहन केली पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
कदंब महामंडळाने ग्रामीण भागात बससेवा उपलब्ध करून सामान्य जनतेला दिलासा दिला. टूरिस्ट टॅक्सी मालकांच्या बंदच्या वेळी सरकारला कदंब महामंडळाने चांगले सहकार्य केले आहे. सरकारकडून या महामंडळाला सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाणार आहे. आगामी काळात महामंडळाला आणखी शंभर ते दीडशे इलेक्ट्रिक बसगाड्या उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले.
राज्यातील वाहतूक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. वाहतूक व्यवस्थेच्या बदलाची सुरुवात कदंब वाहतूक महामंडळापासून केली जाणार आहे, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
महामंडळाच्या कर्मचार्यांच्या पगारामुळे खर्चाचे प्रमाण वाढत आहे. मडगाव, म्हापसा व इतर भागातील बसस्थानकाची कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे, असेही वाहतूक मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.
कदंब महामंडळाच्या बॅटरीवर चालणार्या नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या येत्या सहा ते सात महिन्यात गोव्यातील रस्त्यावरून धावणार आहेत. कदंब महामंडळाच्या प्रत्येक बसस्थानकावर चाजिर्ंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी दुचाकी, तीन चाकी, चार चाकी इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगची सोय उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक शहरात चार्जिंग उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी योग्य पाऊल उचलण्यात येत आहे, अशी माहिती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक फुर्तादो यांनी दिली.