कदंब महामंडळाच्या १४५ बसगाड्या दिव्यांग नागरिकांसाठी अनुकूल अशा बनविण्यात येणार आहेत. कदंबच्या बसगाड्यांत दिव्यांग नागरिकांना व्हिलचेअर नेण्यासाठी हायड्रॉलिक लिफ्टची व्यवस्था करण्यात येत असून, राज्यातील १२ बसस्थानकावर येत्या २ महिन्यांत हायड्रॉलिक लिफ्टची सोय केली जाणार आहे.
गोवा दिव्यांग हक्क असोसिएशनचे अध्यक्ष आवेलिनो डिसा यांनी सांगितले की, वर्ष १९९५ मध्ये नवीन दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर २००७ मध्ये कायद्याचे शिक्षण घेणार्या काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात बसगाड्या आणि इमारती दिव्यांगासाठी अनुकूल बनविण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. कदंब महामंडळाने बसगाड्या दिव्यांगस्नेही बनविण्याचे आश्वासन दिले होते.
तथापि, कदंबने कोणतीही कृती न केल्याने २०२१ मध्ये उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्यात आली. आता, कदंब महामंडळाने हायड्रॉलिक लिफ्टची व्यवस्था केली आहे, अशी माहिती डिसा यांनी दिली.
येथील कदंब बसस्थानकावर हायड्रॉलिक लिफ्टचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. या लिफ्टच्या माध्यमातून दिव्यांग नागरिक व्हिलचेअर बसगाडीमध्ये नेऊ शकतो. प्रात्यक्षिकाच्या वेळी विशांत नागवेकर, राज्य कायदा सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आम्रे, कदंबचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांची उपस्थिती होती.