वयस्क चालक, वाहकांसाठी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय
कदंब महामंडळ रुळावर आणून ते स्वावलंबी बनविण्यासाठी ३०० कोटींचा ‘कोर्पस’ निधी तयार करणार असून त्यापासून मिळणार्या व्याजातून महामंडळाच्या कारभारात सुधारणा करणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.
कदंब महामंडळाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वयाच्या प्रश्नामुळे अनेक कदंब चालक थकले आहेत. त्यांना वाहन चालविणे शक्य होत नाही. अशा चालकांना वेगळे काम देण्याचा किंवा त्यांना नुकसान होणार नाही, असा पर्याय शोधण्याचा विचार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
सुमारे ७० कदंब चालक व वाहकांना स्वच्छ निवृत्ती योजनेचा लाभ देण्याची तयारी त्यांनी दर्शविली. प्रवाशी वाहतूक क्षेत्रात कदंब महामंडळाचा वाटा महत्वाचा आहे. मार्च २०१५ पर्यंत नवीन आधुनिक बस गाड्या आणण्यात येणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. कदंब महामंडळात सुधारणा घडवून आणण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गात शिस्त आणणे महत्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. वाहतूक मंत्री सुदीन ढवळीकर यांनी महामंडळात संगणकीकरण करून प्रवाशांना चांगली सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले.