कदंबचे कर्मचारी 19 मार्चपासून बेमुदत संपावर

0
2

>> पणजीतील मोर्चावेळी इशारा; मागण्यांकडे लक्ष वेधले

आपल्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने कदंब वाहतूक महामंडळाच्या चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी येत्या 19 मार्चपासून बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा काल दिला.

आयटक या कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कदंब वाहतूक महामंडळाच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांनी काल पाटो-पणजी परिसरात मोर्चा काढून आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कदंब महामंडळाच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 19 माचपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयटकचे नेते खिस्तोफर फोन्सेका यांनी मोर्चानंतर बोलताना दिली. कदंब कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर व इतर संबंधितांना अनेक निवेदने सादर केली; पण अजूनपर्यंत त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही फोन्सेका यांनी सांगितले.

कदंबच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, कदंब कर्मचाऱ्याचे 34 महिन्यांचे थकित वेतन तात्काळ द्यावे, पीएफसाठी 12 टक्के योगदान पुन्हा सुरू करावे, 300 नवीन डिझेल बसगाड्यांची खरेदी करावी, तीन किंवा जास्त वर्षे सेवा पूर्ण केलेल्या चालक व वाहक कर्मचाऱ्यांना कायम करावे. पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम पदे नसल्यास समान वेतन व दर्जा द्यावा, वरिष्ठ वाहकांना वाहतूक नियंत्रक म्हणून बढती द्यावी, 120 टीसी पदे भरावी, वाहन परीक्षकांची नियुक्ती करावी, माझी बस योजना त्वरित बंद करावी, इलेक्ट्रिक बस गाड्याचे ऑपरेशन आणि देखभाल खासगी ठेकेदाराकडे देणे थांबवावे, जुलै 2019 पासून प्रलंबित असलेल्या 12 वाहकांच्या वेतन निश्चितीतील तफावत त्वरित सोडवावी, अशा कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.