कदंब वाहतूक महामंडळाने राज्य व केंद्र सरकारची कर्मचारी महामंडळे, स्वायत्त तसेच सरकारी अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या पास सेवेतून येत्या 1 जुलैपासून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कदंब वाहतूक महामंडळाच्या संचालक मंडळाने सरकारी कर्मचारी, महामंडळ, स्वायत्त आणि सरकारी अनुदानित संस्थांच्या कर्मचाऱ्यांना पास सेवेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कदंब महामंडळ नुकसानीत चालत आहे. कदंब महामंडळाला नुकसान कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी, अनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना पास सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कदंब महामंडळाच्या पास सेवेचा सरकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात लाभ घेत होते. आता, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पासेसचे नूतनीकरण केले जाणार नाही. सरकारी कर्मचारी सध्या असलेला पास निर्धारित मुदतीपर्यंत वापरू शकतात, असे कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.