कदंबचा संप मागे

0
86

थकबाकी देण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासन
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या वेतनाची थकबाकी देण्याचे आश्‍वासन काल दिल्याने कदंब कर्मचार्‍यांनी आज २८ रोजीपासून संपावर जाण्याचा आपला निर्णय मागे घेतला.
कदंब महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सकाळी चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार शिष्टमंडळाने कदंब कामगार संघटनेचे नेते ज्योकीम फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी येथील सचिवालयात मुख्यमंत्र्याची भेट घेतली. नवी दिल्लीहून गोव्यात आगमन होताच पर्रीकर यांनी काल कदंब कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत पर्रीकर यांनी कदंब कर्मचार्‍यांना त्यांच्या थकबाकीच्या चार हप्त्यांपैकी दोन हप्ते देण्यासाठीचे पैसे आपण आजच वितरित करतो असे सांगितले. गणेश चतुर्थीच्या सुटीनंतर थकबाकीचे हे पैसे कर्मचार्‍यांना मिळू शकतील असे पर्रीकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे कर्मचार्‍यांनी आज २८ पासूनचा संपाचा निर्णय मागे घेतला.
दरम्यान, शिष्टमंडळाने कदंब कर्मचार्‍यांना बोनसही मिळाला नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोनसबाबत १२ सप्टेंबर रोजी चर्चा करू, असे शिष्टमंडळाला सांगितले.
काल मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात ज्योकीम फर्नांडिस यांच्याबरोबरच कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, कदंब कामगार संघटनेचे गजानन नाईक, गुणी नाईक, आदींचा समावेश होता.