>> डिसेंबरपर्यंत महामंडळाला हैद्राबादहून 90 बस मिळणार
कदंब महामंडळाकडे तब्बल 200 बसेस कमी असून येत्या डिसेंबरपर्यंत महामंडळाला 90 बसेस मिळणार आहेत. हैद्राबाद येथील ‘ऑलेक्ट्रा’ ह्या कंपनीकडून या बसेस मिळणार असल्याचे कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार उल्हास तुयेकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. त्याशिवाय आयआयटी ॲल्युमिनी कौन्सिल सीएसआरखाली गोव्याला 700 कोटी रु. एवढा निधी उपलब्ध करून देणार आहे. त्याद्वारे कदंब महामंडळ तब्बल 500 इलेक्ट्रीक बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कदंब महामंडळाकडे मुबलक बसेस असतील. परिणामी ग्रामीण भागातही तसेच आंतरराज्य मार्गांवरही बसेस वाढवणे महामंडळाला शक्य होणार असल्याचे तुयेकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
हैद्राबाद येथील ऑलेक्ट्रा कंपनीने चालू महिन्यात 5 बसेस दिलेल्या आहेत. तर उर्वरित 90 बसेस ही कंपनी येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत देणार आहे. खरे म्हणजे या बसेस आम्हाला गेल्या जानेवारी महिन्यातच मिळणार होत्या. ह्या 90 बसेच मिळाल्यानंतर पेडणे व डिचोली तालुक्यात अतिरिक्त बसेस सुरू करणे शक्य होणार आहे. तसेच बेळगाव, हुबळी, शिर्डीण, पुणे, हैद्राबाद या मार्गांवर तसेच राज्यातील काही अन्य मार्गांवरही अतिरिक्त बसेस गरजेनुसार सुरू करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पणजी ते मडगाव, पणजी ते वास्को, मडगाव ते वास्को या शटल सेवेतही अतिरिक्त बसेस सुरू करण्याची गरज असल्याचे तुयेकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. आता येणार असलेल्या सर्व बसेस या इलेक्ट्रीक बसेस असल्या तरी ह्या बसेस आंतरराज्य मार्गांवर चालू करता येणार नाहीत. चार्जिंगची सोय नसल्याने त्या मार्गांवर आमच्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या डिझेलवरील बसेसच पाठवण्यात येतील. त्या बसेस ज्या मार्गांवरून धावत होत्या त्या मार्गांवर नव्याने येणार असलेल्या इलेक्ट्रीक बसेसच्या ताफ्यातील बसेस पाठवण्यात येतील, असे तुयेकर यांनी स्पष्ट केले.
55 बस भंगारात काढल्या
15 वर्षे चालवून जुन्या झालेल्या 55 बसेस दोन महिन्यांपूर्वी महामंडळाला भंगारात काढाव्या लागल्या. त्यामुळे महामंडळाला पूर्वीच जी बसेसची उणीव भासत होती त्यात आणखी भर पडली आहे. आता तब्बल 200 बसेसची उणीव निर्माण झाल्याने बेळगाव, हुबळी, शिर्डी, पुणे व हैद्राबाद ह्या फायद्यात असलेल्या आंतरराज्य मार्गांवरील बसेसची संख्या कमी करावी लागल्याचे तुयेकर यांनी स्पष्ट केले. बेळगावला रोज गोव्यातून कदंबच्या 16 बसेस जायच्या. आता अवघ्या 5 ते 6 बसेस बेळगावला पाठवता येत असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात आणखी सुमारे 250 बसेस भंगारात काढाव्या लागणार आहेत. पण आयआयटी ॲल्युमिनी कौन्सिलकडून 500 बसेससाठी 700 कोटी रु. मिळणार असल्याने समस्या निर्माण होणार नसल्याचे तुयेकर यांनी स्पष्ट केले.