कथा एका ‘सदाशिवा’ची

0
182

– रामनाथ न. पै रायकर
नशीब ही चीजच मुळी अजब आहे. एखाद्याची कुठल्याही क्षेत्रातील कारकीर्द शेवटपर्यंत फुलतच नाही, तर काहीजणांना ती सुरुवातीलाच बहरण्याचे भाग्य लाभते. परवाच अकाली निधन झालेले नाट्य तसेच चित्रपट कलावंत सदाशिव अमरापूरकर यांचा समावेश आपण अशा दुसर्‍या गटातील भाग्यवंतांमध्ये करू शकतो. एखाद्या मराठी माणसाने हिंदी मुलूखात घेतलेली नेत्रदीपक झेप बघायची झाल्यास अमरापूरकरांच्या कारकिर्दीचे उदाहरण द्यावे लागेल.सुमारे चार दशकांपूर्वी रजतपटावर झळकलेल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नवे मानदंड निर्माण करणार्‍या ‘शोले’मधून ‘गब्बरसिंग’ या खलनायकाची भूमिका साकारणारा कलाकार अमजद खान यांनी प्रथम पदार्पणातून ‘न भूतो न भविष्यति’ असे यश प्राप्त केले. त्यांचे हे यश इतके देदीप्यमान होते की त्या यशाखाली अमजद खान यांची पुढील दीड दशकाची कारकीर्द झाकोळून गेली. त्यांनी अगदी जीव तोडून साकारलेल्या भूमिकादेखील ‘गब्बरसिंग’च्या तुलनेत प्रेक्षकांना फिक्या वाटू लागल्या आणि शेवटी शेवटी तर या अभिनेत्यावर अगदी दुय्यम दर्जाची नगण्य पात्रे रंगविण्याची पाळी आली. अमरापूरकरांचेही काही असेच झाले. त्यांच्या कारकिर्दीची चिकित्सा त्यांच्या अभिनयाच्या वकुबावर झालेला अन्याय स्पष्टपणे अधोरेखित करते.
तसे बघायला गेले तर अहमदनगरमध्ये जन्म आणि शिक्षण झालेल्या अमरापूरकरांना सुरुवातीला अभिनयक्षेत्राबद्दल मुळीच आस्था नव्हती. त्यांना क्रीडाक्षेत्रात, त्यात खास करून क्रिकेटमध्ये रस होता आणि त्यामध्ये त्यांनी खाशी प्रगतीही केली होती. इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन एम.ए.पर्यंतचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अमरापूरकरांना महाविद्यालयात दाखल होईपर्यंत मध्ये कधीतरी एकांकिकेत काम करण्याची संधी लाभली आणि त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन स्तरावरच्या एकांकिका तसेच नाट्यस्पर्धेत पुरस्कार प्राप्त करण्यापर्यंत मजल मारली.
अशाच एका नाट्यस्पर्धेत काम करताना सुप्रसिद्ध नाट्यलेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी अमरापूरकरांचे गुण हेरले. त्यांच्याच सूचनेवरून ‘द गोवा हिंदू असोसिएशन’चे एक महत्त्वाचे पदाधिकारी व नामवंत नाट्यकलाकार भिकू पै आंगले यांनी अमरापूरकरांना आपल्या नाटक कंपनीमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईला आमंत्रित केेले. खुद्द अमरापूरकरांनीच सांगितल्याप्रमाणे आंगले व असोसिएशनचे आणखी एक वरिष्ठ पदाधिकारी रामकृष्ण नायक यांच्या मनात अमरापूरकरांना ‘नटसम्राट’मध्ये अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेसाठी घ्यायचा विचार होता. ‘‘तोपर्यंत डॉ. लागू व दत्ता भट यांनी रंगभूमीवर बेलवलकर साकारला होता. असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी या भूमिकेसाठी मला घ्यायचे जवळपास नक्की केले होते, पण मग ती भूमिका सतीश दुभाषींकडे चालत गेली व मी मुंबईहून नगरला परतलो,’’ अमरापूरकरांनी अशा शब्दांत आकाशवाणीच्या विविध भारती वाहिनीला दिलेल्या एका दिलखुलास मुलाखतीमध्ये ही माहिती दिली होती.
सुदैवाने अमरापूरकर फारकाळ मुंबईपासून दूर राहू शकले नाहीत. एका ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला गणेश कुमार नारवडे लवकरच सदाशिव अमरापूरकर बनून मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर दाखल झाला. ‘द गोवा हिंदू असोसिएशन’चे आणि जयवंत दळवीलिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे त्यांचे सुरुवातीच्या काळातील एक महत्त्वाचे नाटक. त्याच काळात इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेशी त्यांची नाळ जुळली. ‘छिन्न’ या नाटकाने त्यांच्या अभिनयामधील प्रगल्भतेची प्रेक्षकांना ओळख पटविली. ‘कन्यादान’ नाटकाने तर त्यांचे विजय तेंडुलकरांसारख्या प्रतिभासंपन्न नाटककाराशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. पुढे तेंडुलकरांनीच त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील मार्ग सुकर केला.
मुंबईत व्यावसायिक रंगभूमीवर गर्क असताना अमरापूरकरांनी १९७९ साली जयू आणि नचिकेत पटवर्धनांच्या ‘२२ जून १८९७’ या मराठी चित्रपटामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका फार जोशात रंगविली. त्यांच्या आणि टिळकांच्या चेहरेपट्टीत असलेल्या साम्यामुळे तसेच त्यांच्या दणकेबाज अभिनयामुळे ही भूमिका इतकी गाजली की पुढे १९८० च्या दशकात दूरदर्शनवरील राष्ट्रीय नेत्यांच्या जीवनावर बेतलेल्या एका हिंदी मालिकेत त्यांनी परत एकवार टिळक साकारला व राष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
सन १९८१-८२ च्या काळात भक्ती बर्वे आणि अविनाश मसुरेकर या कलाकारांबरोबर ‘हॅण्डस्-अप’ या मराठी नाटकात एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करत असताना एका प्रयोगाला सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-छायालेखक गोविंद निहलानी आल्याचे अमरापूरकरांना कळले.
‘‘त्यावेळी निहलानी हे श्री. दा. पानवलकरांच्या ‘सूर्य’ या लघुकथेवर ‘अर्धसत्य’ हा चित्रपट तयार करण्यात गुंतले होते, ज्याची पटकथा तेंडुलकरांनी लिहिली होती. तेंडुलकरांनीच चित्रपटातील एका पात्रासाठी माझे नाव निहलानींना सुचवले होते. ‘हॅण्डस्-अप!’मध्ये मी एका पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करत असल्यामुळे मला ‘अर्धसत्य’मधल्या पोलीस ऑफिसरचा रोल करायची संधी मिळेल असा आडाखा मी बांधला आणि निहलांनीसमोर सर्व शक्ती पणाला लावून त्या दिवशी नाटकात काम केले,’’ अमरापूरकरांनी आपल्या आकाशवाणीवर झालेल्या मुलाखतीत या आठवणी ताज्या केल्या होत्या.
मात्र पुढे जे काही झाले ते अघटितच म्हटले पाहिजे. निहलानींनी अमरापूरकरांना ‘अर्धसत्य’मधील रामा शेट्टी या गुंडाची भूमिका साकारण्यासाठी नक्की केले. तोपर्यंत चोर, डाकू, स्मगलर, खुनी अशा परिचित भूमिकांद्वारे प्रेक्षकांसमोर हिंदी चित्रपटांमधून येणार्‍या खलनायकांना ‘अर्धसत्य’ने फाटा दिला. रामा शेट्टी हा खरे म्हणजे आजच्या चित्रपटांमध्ये सर्रासपणे आढळणारा ‘भाई’ होता. १९८० च्या दशकात हाजी मस्तान, वरदराजन मुदालियार, करीम लाला अशा स्मगलर्स व मटकेबाजांना बाजूला सारून मन्या सुर्वेसारखे ‘भाई’ पुढे येत होते. अशा कालखंडात रामा शेट्टीचा प्रभाव प्रेक्षकांवर पडला नसता तरच नवल!
जेव्हा ‘अर्धसत्य’ १९८३ साली प्रदर्शित झाला तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टी तसेच हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक यांना अमरापूरकरांबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र पूर्ण चित्रपटात केवळ तीनचार दृश्ये असलेल्या या कलाकाराने प्रसंगी ओमपुरीसारख्या कसलेल्या कलाकारावरदेखील मात केल्याचे प्रेक्षकांना जाणवले. ‘मैं तुम्हे गिरफ्तार कर रहा हूँ’ असे म्हणणार्‍या ओमपुरी यांनी साकारलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला बेफिकिरीने ‘कल आना, देखेंगे’ म्हणणारा रामा शेट्टी अंगावर काटा उभा करून राहिला होता. पैशांचा माज व बळाची गुर्मी आपल्या देहबोलीतून दाखविणारा ‘रामा शेट्टी’ अमरापूरकरांना १९८४ सालातील उत्कृष्ट सहअभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देण्यात यशस्वी ठरला. अमरापूरकरांची पुढील दहा वर्षांची कारकीर्द मात्र नको त्या अर्थाने यशस्वी ठरली. ‘हुकुमत’, ‘एलान-ए-जंग’, ‘फरिश्ते’, ‘खतरों के खिलाडी’, ‘दूध का कर्ज’ तसेच यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी खलनायक साकारताना यशाची गोडी चाखली असली तरी त्याच-त्याच पठडीतल्या भूमिका रंगविताना त्यांच्या अभिनयकौशल्यावर बर्‍याच प्रमाणात अन्याय झाला. तोपर्यंत रंगभूमीपासून दूर गेलेल्या या मराठी माणसाने कैक चित्रपटांमधून अगदी कींव यावी इतक्या केविलवाण्या भूमिका साकारल्या. पुढे १९९३ साली दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आपल्या ‘सडक’ चित्रपटात कुंटणखाना चालविणार्‍या ‘महारानी’ नामक एका तृतीयपंथी इसमाच्या भूमिकेसाठी अमरापूरकरांना आमंत्रित केले. अत्यंत ओंगळ व हिडिस असे हे पात्र अमरापूरकरांनी इतक्या प्रभावीपणे साकारले की त्यांना त्याच वर्षी फिल्मफेअर मासिकाने सुरू केलेला उत्कृष्ट खलनायक श्रेणीतील पुरस्कार प्राप्त झाला. चित्रपटाच्या नायकावर (संजय दत्त) सतत हल्ले करणारी ‘महारानी’ शेवटी नायकापुढे हतबल ठरते आणि ‘आगे मत बढना… अरे एक हिजडे पे हाथ उठाता है?’ म्हणून अंतिम अस्त्र काढते तेव्हा प्रेक्षक हमखास टाळ्यांचा कडकडाट करीत असत.
‘सडक’नंतर अमरापूरकरांनी ‘तेच रोल, तीच स्टायलाइझ्ड ऍक्टिंग करून करून थकून गेलो’ म्हणत रजतपटावर खलनायक रंगविण्याचे काम कमी केले. ‘आँखे’, ‘गुप्त’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी विसरभोळा पोलीस इन्स्पेक्टर रंगवित विनोदी भूमिकाही केल्या. परंतु हा सगळा प्रपंच त्यांना चांगले काम करण्याचा संतोष देऊ शकला नाही. रमेश बहलपासून (‘जवानी’) ते इंद्रकुमारपर्यंत (‘इश्क’) आणि विधू विनोद चोप्रापासून (‘खामोश’) ते के. विश्‍वनाथपर्यंत (‘ईश्‍वर’) अनेक नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत काम करूनही अमरापूरकर शेवटपर्यंत चांगल्या भूमिकांच्या शोधातच राहिले. देव आनंदसोबत ‘सच्चे का बोलबाला’ किंवा अमिताभ बच्चनसोबत ‘आखरी रास्ता’ अशा चित्रपटांमधून त्यांनी समोर मोठे कलावंत असतानाही आपली चमक दाखविली.
अलीकडेच ‘बॉम्बे टॉकिज’ हा चार वेगवेगळ्या कथा सादर करणारा चित्रपट अमरापूरकरांचे दुर्लभ दर्शन देऊन गेला. सदर चित्रपटामधील ‘स्टार’ या कहाणीत अमरापूरकरांनी केवळ दोनतीन मिनिटांची भूमिका साकारली होती. नवाझुद्दिन सिद्धिकी या कलाकाराच्या दिवंगत पित्याच्या भूमिकेत अमरापूरकर ‘हॅम्लेट’च्या बापाच्या भुतासारखे प्रकट होतात. ‘नटसम्राट’मधील हुकलेल्या अप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेशी ‘स्टार’मधील अमरापूरकरांचा हा रोल मेळ खात होता. दिवाकर बॅनर्जी दिग्दर्शित या कथानकात, अमरापूरकरांनी नवाझुद्दिनला अभिनयाबद्दल धडे देण्यासाठी पृथ्वीवर पुनरागमन करणार्‍या एका रंगमंच कलाकाराचा आत्मा साकारला होता. अमरापूरकरांचा शेवटचा चित्रपट ठरलेल्या ‘बॉम्बे टॉकिज’मधील ‘स्टार’ कथानकात एका अर्थाने कलाकारांची व्यथाच मांडण्यात आली होती, जी बर्‍याच अंशी अमरापूरकरांनाही लागू होते.
अमरापूरकर रंगमंच व चित्रपटाप्रमाणे दूरचित्रवाणी मालिकांमध्ये मात्र फारसे रमले नाहीत. त्यांनी मध्यंतरी आचार्य चतुरसेन यांच्या ‘सोमनाथ महालय’ या कादंबरीवर आधारित ‘शोभा सोमनाथ की’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये काम केले होते. पण दूरचित्रवाणीवरील त्यांचा हा प्रवास फार पुढे सरकू शकला नाही. हिंदी चित्रपटांप्रमाणे अमरापूरकर यांनी मराठी, बंगाली, ओरिया व हरयानवी चित्रपटांमधूनही भूमिका केल्या होत्या. त्यांनी ‘कदाचित’ या मराठी चित्रपटामध्ये साकारलेली आश्‍विनी भावे या अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका प्रेक्षकांच्या तसेच समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली होती. वडील आणि मुलीच्या ताणलेल्या संबंधावर आधारित या चित्रपटाने अमरापूरकरांना आपल्या अभिनयाचे पैलू दाखविण्याची संधी दिली.
अमरापूरकरांच्या जीवनाची वाखाणण्यासारखी आणखी एक बाजू म्हणजे त्यांचे समाजाप्रति असलेले दायित्व आणि त्यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अहमदनगर ऐतिहासिक वास्तू संग्रहालय अशा अनेक सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी ते शेवटपर्यंत निगडित होते. निळू फुले या अभिनेत्याप्रमाणे तळागाळातील माणसांच्या भल्यासाठी झटणारे अमरापूरकर त्यांच्या पत्नीसोबत ग्रामीण भागातील तरुण व त्यांच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील होते.
अगदी अलीकडे औरंगाबाद येथे घेतल्या गेलेल्या त्यांच्या मुलाखतीमध्ये अमरापूरकर यांनी झपाट्याने र्‍हास पावणार्‍या सामाजिक भानाबद्दल तसेच राजकारणाबद्दल चीड व्यक्त केली होती. ‘टीव्ही आणि मोटारींनी महासत्ता होत नाही’ असे म्हणत त्यांनी जागतिकीकरणावर टीका करीत ‘जोपर्यंत दोन वेळचे जेवण आणि शांत झोप मिळत नाही तोपर्यंत भारत महासत्ता बनणे शक्य नाही’ असे व्यक्तव्यही केले होते. पुस्तकात गुरफटणारे आणि ग्लॅमर तसेच पार्ट्यांमध्ये न भटकणारे अमरापूरकर पडद्यावरचे खलनायक असले तरी खर्‍या अर्थाने समाजातील नायक होते. त्यांच्या जाण्याने रंगमंच आणि रुपेरी पडद्याइतकेच समाजाचेही नुकसान झालेले आहे.