कणकुंबी तपासणी नाक्यावर 8 लाखांची रोकड हस्तगत

0
15

गोवा-कर्नाटक सीमेवरील कणकुंबी तपासणी नाक्यावरील कर्नाटक निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या पथकाने गोव्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एका कारमधून सुमारे 7 लाख 98 हजार रुपयांची रोकड काल ताब्यात घेतली.

कणकुंबी येथील तपासणी नाक्यावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोवा ते बेळगाव या मार्गावरून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या एका कारची तपासणीसाठी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. निवडणूक अधिकाऱ्यांनी कारचालकाला रोख रकमेबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली. तथापि, तो आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात अपयशी ठरल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी 7 लाख 98 हजार रुपयांची रक्कम जप्त केली. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता भंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता गेल्या 16 मार्चपासून लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात एखादी व्यक्ती कागदपत्रांशिवाय 50 हजारांहून अधिक रोख रक्कम घेऊन फिरताना आढळल्यास ती तत्काळ जप्त करण्याचा आदेश भारतीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास अधिकृत कागदपत्रे दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे.