कडुनिंबाची महती

0
61
  • – डॉ. मनाली पवार

गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे. वसंतात सूर्याच्या उष्णतेने कफ वितळतो व पातळ होतो. त्यामुळे कफदोषाचा प्रकोप होतो. म्हणून पंचकर्मापैकी ‘वमन’ हा उपक्रम कफदोषावरील श्रेष्ठ उपाय असल्याने वसंत ऋतूत वमन करावे.

हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारून, गोडधोडाचा स्वयंपाक करून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. ‘गुढीपाडवा’ हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथा आहेत. तरीसुद्धा आजच्या आधुनिक युगातही हा सण तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. झाडांना कोवळी पालवी फुटायला सुरुवात होते. आंबा, बकुळ इत्यादि झाडांवर फुले फुलल्यामुळे आसमंतात सुवास भरून राहतो. कोकिळेचे कुजन ऐकू येण्यास सुरुवात होते.

आंब्याला मोहोर येतो याचे प्रतीक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुनिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात, म्हणजे गुढीपाडव्याचे आरोग्याच्या दृष्टीनेदेखील महत्त्व आहे.
वसंतात सूर्याच्या उष्णतेने कफ वितळतो व पातळ होतो. त्यामुळे कफदोषाचा प्रकोप होतो. म्हणून पंचकर्मापैकी ‘वमन’ हा उपक्रम कफदोषावरील श्रेष्ठ उपाय असल्याने वसंत ऋतूत वमन करावे.
या दिवसापासून आपले आरोग्य संपादन करण्यासाठी आपल्या आहार-विहारामध्ये थोडा बदल करावा. पचावयास हलके व तेलकट नसणारे जेवण जेवावे.

जेवणात ज्वारी, बाजरी, जुने तांदूळ यांपासून तयार केलेली भाकरी, फुलका, रोटी, भात, खिचडी सेवन करावी. भाजणीचे थालीपीठही चालते.
डाळी व कडधान्यांपैकी मूग, मटकी, ताजा हरभरा, कुळीथ, मसूर वापरावेत.
भाज्यांमध्ये पालक, मेथी, माठ, कारले, पडवळ, दोडके, भोपळा, शेवग्याच्या शेंगा य भाज्या खाव्यात.
विविध मसाले उचित प्रमाणात वापरावेत. कारण त्यामुळे मंद झालेल्या जठराग्नीची शक्ती वाढते. म्हणून जेवणात ओवा, हिंग, हळद, मोहरी, काळे मिरी, जिरे, धणे, कढीपत्ता, आले यांचा वापर करावा.

  • मुळा, गाजर, बीटरुट, कोबीची पाने, पालक यांपासून तयार केलेली कोशिंबीर खावी.
  • रोज दुपारच्या जेवणानंतर ताजे ताक जिरा, ओवा, काळेमीठ, आले टाकून प्यावे.
  • जेवणानंतर बडीशेप, धण्याची डाळ, तीळ व ओवा भाजून घेऊन किंचित सैंधव मीठ टाकून तयार केलेले मिश्रण खावे.
  • पाणी नेहमीच उकळून प्यावे. पाणी उकळताना थोडीशी सुंठ व नागरमोथा टाकावा. जेवताना किंवा एरव्हीही तहान लागली असता असे संस्कारित पाणी प्याल्यास पचनशक्ती वाढते.
  • योग्य प्रमाणात अनुकूल असा व्यायाम करावा. पण व्यायामापासून थकवा येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोज सकाळी गरम पाण्यात किंचित हळद वा मध टाकून गुळण्या कराव्यात.
  • डोळ्यांमधील कफ कमी करण्यासाठी डोळ्यांत नियमित अंजन घालावे.
  • रोज सकाळी उठल्यावर उकळून गार केलेल्या साध्या पाण्यात चमचाभर मध घालून प्यावे.

कडुनिंबाला या ऋतूत विशेष महत्त्व आहे. म्हणूनच कडुनिंबाची डहाळी गुढीला बांधतात. त्याचप्रमाणे कडुनिंबाचा पाला व मिरी यांची गोळी करून प्रसादरूपाने खातात. हा कडुनिंब त्याचदिवशी फक्त खायचा नसतो तर त्याचा वापर पुढेही ठेवायचा असतो. शास्त्रानुसार कुठल्याही वृक्षाखाली रात्री झोपू नये. कारण झाडे रात्रीचा कार्बन डाय ऑक्साईड वायू सोडत असतात. परंतु निम्ब हे एकच असे झाड आहे जे प्राणदायक, आरोग्यवर्धक व रोगनाशक वायू उत्सर्जन करते.
मृत्युलोकांतील निम्ब हे कल्पवृक्षच आहे. कारण या वृक्षाच्या औषधी प्रयोगाने बर्‍याच व्याधी बर्‍या होतात. वैधकशास्त्रामध्ये चैत्र मासामध्ये कोमल निंबाची पाने सेवन करण्यास प्राधान्य दिले आहे. निंब रक्तशुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम औषधी आहे. सर्व प्रकारच्या कुष्ठ रोगांमध्ये निम्ब हे औषध श्रेष्ठ आहे. कुष्ठ म्हणजे सगळ्या प्रकारचे त्वचारोग होय.
वारंवार ज्यांना त्वचारोग होतात किंवा या काळात ज्यांना त्वचारोग जडतात त्यांनी

  • बाराही महिने निंब वृक्षाच्या सहवासात राहावे.
  • कडुनिंबाच्याच लाकडाने दात घासावेत.
  • कडुनिंबाच्या पानांचा काढा करून त्याने स्नान करावे.
  • व्रणामध्ये कडुनिंबाचे तेल किंवा कडुनिंबाच्या पाल्याची चटणी लावावी किंवा काढ्याने जखम धुवावी.
  • सकाळी १० मिली निंबपत्र स्वरस रोज प्यावे.
  • संपूर्ण शरीराला कडुनिंबाच्या तेलाने मालिश करावे.
    कडुनिंबाच्या बियातील मगज पहिल्या दिवशी एक, पुढे रोज १-१ असे वाढवत १०० दिवस तरी सेवन करावे व परत हेच औषध एक-एक कमी करत यावे.
    अशाप्रकारच्या औषधी सेवनाने कसल्याही प्रकारचे त्वचारोग बरे होतात.
    एलझेमामध्ये निंबपत्र रस पट्टीला लावून पट्टी केल्यास आराम मिळतो.
    श्‍वेत कुष्ठामध्ये कडुनिंबाची पाने, फुले व फळ समभाग घेऊन, त्याची चटणी करून ही चटणी साधारण २ ग्रॅमच्या मात्रेत रोज सेवन केल्यास श्‍वेत कुष्ठ बरा होऊ शकतो.
    त्वचारोगांबरोबर आजकाल ज्या केसांच्या समस्या होतात, त्यासाठीदेखील कडुनिंब उत्तम औषध आहे.
    अकाली केस पिकल्यास किंवा ज्यांचे केस पिकत आहेत त्यांनी कडुनिंबाच्या बियांना माक्याच्या स्वरसाची भावना देऊन तेल काढावे व हे तेल २-२ थेंब नाकामध्ये नस्य म्हणून रोज घालावे. हा औषधोपचार चालू असता नुसता दूध-भात सेवन करावा म्हणजे पालित्य (केस पिकणे) समूळ नष्ट होते.
  • केसांच्या वाढीसाठी कडुनिंबाची पाने एक भाग व बोराची पाने एक भाग घेऊन चांगली वाटून त्याचा लेप करावा व हा लेप १-२ तास डोक्याला लावून नंतर धुवून टाकावा. असे वारंवार केल्याने एका महिन्याने नवीन केस यायला लागतात किंवा केसांची वृद्धी होते.
  • निंबाची पाने चांगली पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस सुदृढ होतात. गळायचे थांबतात व केसांमध्ये खाज येत असल्यास नष्ट होते.
  • प्राचीन काळात ‘स्वामीनी’देखील ब्रह्मसमंध रोगात निंबाची पानेच औषध रूपात दिली होती.
    उपक्रम
    या गुढीपाडव्यापासून निंबाचा खालीलप्रमाणे उपयोग सुरू करा म्हणजे उत्तम आरोग्य लाभेल.
  • सकाळी उठून निंबाच्या काडीने दात घासल्याने दात स्वच्छ व तंदुरुस्त होतात. फुलांच्या काढ्याने गण्डूष केल्याने हिरडे मजबूत होतात.
  • दुपारी कडुनिंब वृक्षाच्या छायेत विश्रांती केल्यास शरीर स्वस्थ राहते.
  • संध्याकाळी सुकलेल्या पानांची धुरी घातल्याने डास पळतात.
  • कडुनिंबाच्या पानांच्या काढ्याने स्नान केल्यास सर्व प्रकारच्या रोगांतून मुक्ती मिळते.
  • कडुनिंबाची मुळे पाण्यात उगाळून मुरमांवर लावल्यास त्वचा नितळ होते.
  • ५ ते १० मिली निंबाच्या पानांचा रस नित्य सेवन केल्यास रक्तशुद्धी होते व रक्तवृद्धीदेखील होते.
    अशा प्रकारे विविध रोगांमध्ये व स्वास्थ्य राखण्यासाठी विविध तर्‍हेने कडुनिंबाचे सेवन करूया व आपले आरोग्य सुदृढ, निरोगी बनवूया.