कठोर शिक्षेची गरज

0
2

गिरी येथे छापा टाकून गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अमली पदार्थांचा राज्यातील आजवरचा सर्वांत मोठा साठा जप्त केला. ह्या धडक कारवाईबद्दल संबंधित अधिकारी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. मात्र, अशा प्रकारचे अंमली पदार्थ सातत्याने गोव्यात सापडत आहेत ही देखील तितकीच चिंतेची बाब आहे. गेल्या वर्षी म्हणजे सन 2024 मध्ये जेवढ्या मूल्याचे अमली पदार्थ पकडले गेले होते, त्याहून गिरी येथे पकडल्या गेलेल्या ह्या हायड्रोपोनिक गांजाचे मूल्य जास्त आहे. गेल्या वर्षी राज्यात एकूण 274 किलो अमली पदार्थ पकडले गेले, ज्यांचे एकूण मूल्य सुमारे दहा कोटी रुपये होते. मात्र, गिरी येथील छाप्यात जो 11 किलो 672 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा पकडला गेला, त्याची किंमतच सुमारे अकरा कोटी साठ लाख रुपये आहे. हायड्रोपोनिक म्हणजे कृत्रिम वातावरणामध्ये मातीविना केवळ पाण्यातील खनिजांच्या मदतीने लागवड केला जाणारा गांजा, ज्याची शुद्धता अधिक असल्याने अशा गांजाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असते. हा गांजा गोव्यात थायलंडहून आणला गेला असे तपासात स्पष्ट झाले आहे. थायलंडहून हा गांजा नेपाळमार्गे बंगळुरूला आणला गेला आणि तेथून बसने एक 32 वर्षांचा तरूण तो घेऊन गोव्यात आला होता. ह्याचाच अर्थ एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा ह्या सगळ्यामध्ये सहभाग आहे आणि त्यामुळेच ही अतिशय चिंतेची बाब आहे. आतापर्यंत अशा अनेक टोळ्यांचा गोव्यात वावर असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले. तेलंगणा पोलिसांनी हैदराबादेत पकडलेल्या ड्रग माफियांचे लागेबांधेही गोव्यात असल्याचे यापूर्वी आढळून आले होते. सध्याच्या प्रकरणातील तरुणाने पेडण्यात आणि गिरीमध्ये अशा दोन सदनिका भाड्याने घेतल्या होत्या, जिथे हा अमली पदार्थांचा साठा ठेवला होता. पोलिसांनी महिनाभर पाळत ठेवून अखेर त्याचा पर्दाफाश केला. मात्र, ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणातील हायड्रोपोनिक गांजा गोव्यात आणला गेला आहे, त्या अर्थी त्याला येथे तेवढीच मागणी असेल आणि त्यासाठी वितरक आणि विक्रेत्यांची एक मोठी साखळीही येथे कार्यरत असेलच. त्यामुळे ही वितरण आणि विक्री साखळी शोधून काढण्याची आणि तिचे धागेदोरे कोणाकोणापर्यंत आहेत ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी आता पोलिसांवर आहे. एक गोष्ट सातत्याने समोर येत असते, ती म्हणजे ह्या अमली पदार्थ व्यवहारांमध्ये गोमंतकीयांपेक्षा परप्रांतीय व्यक्तींचा फार मोठा सहभाग असतो. त्यात काही विदेशी नागरिकही गुंतलेले आढळतात. सध्या जो हायड्रोपोनिक गांजा पकडला गेला आहे, त्या प्रकरणात पकडला गेलेला तरूणही बंगळुरूचा आणि बिगरगोमंतकीय आहे. गोव्यामध्ये बारटेंडर म्हणून काम करीत असताना त्याचा अमली पदार्थ विक्रीशी संबंध आला आणि त्यातून त्याने ह्या कामाला वाहून घेतले असे दिसते. म्हणजेच गोव्यातील काही बार आणि शॅक्समधून अमली पदार्थांची विक्री केली जात असते ह्याला ह्या घटनेने दुजोराच मिळालेला आहे. आता हे व्यवहार कुठे आणि कोणामार्फत चालतात हे शोधणे पोलिसांचे काम आहे. गेल्या वर्षी राज्यात अमली पदार्थ व्यवहार करणारे 188 जण पकडले गेले. त्यापैकी 111 बिगरगोमंतकीय होते, तर 23 विदेशी नागरिक होते. उर्वरित 54 गोमंतकीय होते. म्हणजेच ह्या सगळ्या अमली पदार्थ विक्री व्यवहारामध्ये आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय संघटित टोळ्या सक्रिय आहेत ह्याचा हा ढळढळीत पुरावा आहे. मध्यंतरी गोवा सरकारने अमली पदार्थांविरुद्ध ऑपरेशन प्रहार नावाने मोठी मोहीम राबवली. हीच मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याची आणि गोव्याच्या नावाला काळीमा फासणाऱ्या आणि येथील तरुणाईला गैरमार्गाला लावणाऱ्या टोळ्यांचा नायनाट करण्याची जरूरी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अमली पदार्थांबाबत झीरो टॉलरन्सची घोषणा केलेली आहे. त्यामुळे कोणतीही दयामाया न दाखवता आणि राजकीय लाग्याबांध्यांची पर्वा न करता अशा प्रकरणांमध्ये जे जे गुंतल्याचे समोर येईल त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई झाली पाहिजे. अमली पदार्थ व्यवहार प्रकरणांमध्ये सातत्याने छापे पडतात, लोक पकडले जातात, परंतु कठोर शिक्षा झाल्याचे कधीच ऐकिवात येत नाही, ह्याचे कारण सबळ पुरावे सादर करण्यात पोलीस कमी पडतात. राज्यात केवळ अमली पदार्थ सापडलेच असे नव्हे, तर त्यांची लागवड करणारी कुटुंबे देखील आढळून आली. त्यातील कितीजणांना धडा शिकवणारी शिक्षा झाली हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अमली पदार्थांची कीड समूळ उपटून काढायची असेल तर संबंधितांच्या मालमत्तांवर जप्ती आणून जमीनदोस्त केल्या गेल्या पाहिजेत. तपासयंत्रणांचा धाक बसला पाहिजे. कोणीही यावे आणि येथे राजरोस अमली पदार्थांचा व्यवहार करावा हा प्रकार थांबला पाहिजे. अमली पदार्थ आणि गुन्हेगारी एकमेकांच्या हातात हात घालून वावरत असतात. त्यामुळे दोन्हींवर कारवाईचा बडगा उगारला गेला पाहिजे. तरच गोव्याला अमली पदार्थांच्या संकटातून बाहेर काढता येईल. नुसती छापेमारी उपयोगाची नाही. गुन्हेगारांना कठोर शिक्षाही झाली पाहिजे.