गोव्यात सुटी घालवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना अस्तित्वातच नसलेली घरे भाड्याने देण्याचे आश्वासन देऊन त्यांची हजारो रुपयांना फसवणूक करणाऱ्या एका परप्रांतीय टोळीच्या गोवा पोलिसांनी नुकत्याच मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेली ही कारवाई प्रशंसनीय आहे, कारण अशा प्रकारे आजवर किती पर्यटकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल ह्याची कल्पनाही करवत नाही, कारण पोलिसांनीच दिलेल्या माहितीनुसार, ही टोळीच किमान गेली तीन वर्षे हा प्रकार करीत होती. नावाजलेल्या संकेतस्थळांवर घरांची बनावट छायाचित्रे घालून स्वस्तात ती भाड्याने देण्याचे आमीष दाखवून पर्यटकांकडून हजारो रुपये आगाऊ घेतले जायचे. पर्यटक जेव्हा प्रत्यक्ष गोव्यात सुटी घालवण्यासाठी यायचे, तेव्हा त्या ठिकाणी त्या नावाचे घरच अस्तित्वात नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसायचा. सुटी घालवण्यासाठी कुटुंबासमवेत आलेल्या पर्यटकांवर जेव्हा अशी पाळी ओढवेल तेव्हा त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मनःस्थिती काय होईल ह्याची कल्पना कोणालाही येण्यासारखी आहे. येथे केवळ आर्थिक फसवणूक हाच मुद्दा नाही. त्या पर्यटक कुटुंबाचा सुट्टीचा सगळा आनंद येथे हिरावून घेतला जात होता आणि त्याची किंमत पैशांत करता येण्यासारखी नाही. त्यामुळे ही जी टोळी जेरबंद झाली आहे, तिला कठोरातील कठोर शिक्षा होईल ह्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत. आजवर अशा शेकडो पर्यटकांना ह्या टोळीने गंडा घातला असेल. पोलिसांनी दिलेला अंदाज पाचशेचा आहे, परंतु प्रत्यक्षात ज्या नामांकित संकेतस्थळावरून ही फसवणूक झाली, ते देशी नव्हे, तर आंतरराष्ट्रीय संकेतस्थळ आहे हे लक्षात घेता त्यावरून किती पर्यटक ह्या फसवणुकीला बळी पडले असतील कल्पनाही करवत नाही. ह्या टोळीची पंधराहून अधिक बँक खाती सापडली आहेत. ही सर्व बँक खाती गोठवली जावीत. त्यांची मालमत्ता गोठवली जावी आणि त्यांनी फसवणूक केलेल्या सर्व पर्यटकांचा शोध घेतला जावा. फसवणूक झालेल्या पर्यटकांनी ह्यापूर्वी गोवा पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या का, केल्या असतील तर त्यांच्यावर आजवर कारवाई झाली नव्हती का, ह्याचाही शोध घेतला गेला पाहिजे. जे पर्यटक ह्या फसवणुकीला बळी पडले, त्यांनी आपली फसवणूक झाल्यावर निश्चितपणे पोलिसांशी त्या त्या वेळी संपर्क साधला असेलच. त्यावेळी त्यांना काय वागणूक मिळाली, आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा तर प्रयत्न झाला नव्हता ना हेही तपासले गेले पाहिजे. चंडीगढच्या पर्यटकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सध्या जी कारवाई केली ती स्तुत्य असली, तरी ह्यापूर्वी अशा तक्रारींकडे दुर्लक्ष झाले होते का हेही शोधले गेले पाहिजे, कारण हजारो रुपयांची फसवणूक होऊनही पर्यटक पोलिसांत न जाता स्वस्थ बसतील हे संभवत नाही. ज्या आंतरराष्ट्रीय संकेतस्थळाचा वापर करून फसवणूक झाली, त्यांनाही कायद्याचा बडगा दाखवला गेला पाहिजे. आपल्या सेवा पुरवठादाराची खात्री न करता त्यांची जाहिरात आपल्या संकेतस्थळावरून करणे म्हणजे गुन्ह्यात सहभाग ठरतो. त्यामुळे प्रस्तुत प्रकरणी संबंधित संकेतस्थळावरही कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. ह्या टोळीने अशा प्रकारच्या किती संकेतस्थळांवरून असले व्यवहार चालवले होते, कितीजणांची फसवणूक झाली हे जेव्हा समोर येईल तेव्हा ह्या फसवणुकीचा नेमका आकडा समोर येईल. परंतु तो निश्चितच कोट्यवधींच्या घरात जाईल. त्यामुळे एकट्यादुकट्या पर्यटकाच्या फसवणुकीचे हे प्रकरण मानून त्याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. अशा प्रकारच्या आणखी काही टोळ्या सक्रिय आहेत का हे शोधले गेले पाहिजे. यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या हॉटेलची बनावट संकेतस्थळे बनवून पर्यटकांची फसवणूक झालेली आहे. नामांकित हॉटेलांची बनावट संकेतस्थळे बनवून फसवणूक करण्यापर्यंतही अशा गुन्हेगारांची मजल गेलेली आहे. त्यामुळे ह्यासंदर्भात कसोशीने तपास झाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या इतर टोळ्या आहेत का हेही शोधले गेले पाहिजे. हे प्रकरण दिसते तितके साधे नाही. हा गोव्याच्या पर्यटनाच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने अत्यंत गांभीर्याने ह्या प्रकरणाचा तपास करावा आणि गुन्हेगारांना कायद्यातील पळवाटांचा फायदा मिळणार नाही, तपासकामातील त्रुटींचा फायदा मिळणार नाही हे कसोशीने पाहावे. अशा घटना घडतात तेव्हा पर्यटनक्षेत्राला त्याचा मोठा फटका बसत असतो. पर्यटकांमध्ये अविश्वास निर्माण झाला तर तो भरून काढणे सोपे नसते. आधीच गोव्याचे पर्यटनक्षेत्र घसरणीला लागले आहे. सरकार 21 टक्के पर्यटक वाढल्याचे म्हणत असले तरी गोव्याऐवजी पर्यटक अन्यत्र धाव घेऊ लागले आहेत हे स्पष्ट दिसते आहे. पर्यटकांमध्ये गोव्याविषयीचा विश्वास पुन्हा जागवण्याची गरज आहे.