‘कच्चा लिंबू’त विशेष मुलांच्या पालकांच्या समस्यांवर प्रकाश

0
117

 विशेष मुलाखत 

  • कालिका बापट

 >> दिग्दर्शक प्रसाद ओक

‘कच्चा लिंबू’ या चित्रपटात विशेष मुलं असणार्‍या विशेष पालकांच्या समस्यांचे भान ठेवून, त्यांचे जगणे मांडण्यात आले आहे. विशेष मुलांचा विषय गंभीर आहेच, त्याहीपेक्षा त्यांच्या पालकांच्या समस्या फार मोठ्या असतात. याचीच जाणीव ठेवून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना शेवटी प्रेमच हवं असतं, ते आपण या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जगभरातून आलेल्या कलाकार आणि प्रतिनिधींनी ‘कच्चा लिंबू’ आवडल्याचे सांगितले. माझा पहिलाच चित्रपट असा वाखाणला जावा, याहून दुसरे सुख ते कोणते? पदार्पणातलाच चित्रपट इफ्फीत स्पर्धेसाठी निवडावा ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. शिवाय मराठी सिनेसृष्टीसाठीही ही अभिमानाची गोष्ट आहे. माझे हे यश सर्व मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी अर्पण करतो, असे मत अभिनेता, गायक, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी विशेष मुलाखतीत व्यक्त केले. इफ्फीत सर्वांत जास्त गाजणारा चित्रपट म्हणून कच्चा लिंबू या चित्रपटाकडे पाहिले जाते. सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव यांच्या जबरदस्त भूमिका आणि प्रसाद ओक यांचे प्रभावी दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे.

कच्चा लिंबू करताना हा चित्रपट इफ्फीत निवडला जाणार आणि त्याहीपेक्षा तो स्पर्धेत जाणार असं वाटलं होतं का?
– सच्चा कलाकार हा पुरस्कारांसाठी काम करत नसतो. मला चित्रपट करायचा होता आणि हा विषय लोकांपर्यंत पोचवायचा होता. यश – अपयशाच्या गणितांपेक्षा आपला विषय सर्वांपर्यंत जाणे महत्त्वाचे आहे. चित्रपट स्पर्धेत गेला याचा आनंद तर आहेच, शिवाय प्रेक्षकांकडूनही चांगल्या प्रतिक्रिया मिळतात, याचाही आनंद आहे.

रवी जाधवांना या चित्रपटातील मुलाच्या वडिलांची भूमिका देण्याचे कारण?
– रवी जाधव हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक. मला यात वडिलांच्या भूमिकेसाठी असाच चेहरा पाहिजे होता. त्यासाठी मला कुणी अभिनेता नको होता. एकदा त्यांची भेट झाली असता, या भूमिकेसाठी त्यांना विचारले. आधी त्यांना त्याचे नवल वाटले; परंतु तो तयार झाला. रवी जाधवने इतर कलाकारांप्रमाणेच आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तो जसा बोलतो, दिसतो, तसाच वडील भूमिका साकारणारा मला या चित्रपटासाठी हवा होता.

गायक, अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक अशी भूमिका यापुढेही साकारणार का?
हो नक्कीच. त्यासाठी श्रेय कच्चा लिंबूला. माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टी चित्रपट निर्मितीसाठी वापरण्याचा प्रयत्न करीन. यापुढेही प्रेक्षकांना चांगला चित्रपट देण्याची इच्छा आहे.

आपल्या म्हणण्याप्रमाणे मराठी भाषेतील साहित्य समृद्ध आहे, श्रीमंत आहे. अशी एखादी साहित्यकृती पुढच्या चित्रपटासाठी मनात आहे का?
– खूप आहेत. किती सांगणार? सुप्रसिद्ध साहित्यिक भैरप्पा यांची ‘काठ’ ही सुंदर कादंबरी आहे. संधी मिळाली तर त्यावर पुढे कधी नक्कीच चित्रपट करीन. त्याशिवाय माझे आवडते असे साहित्यिक आहेत, ज्यांनी आपल्या साहित्यातून मनोरंजनाबरोबरच चांगले विषय मांडले आहेत. त्यांच्याही साहित्यकृतींचा विचार करीन.

अभिनेता म्हणून आत्तापर्यंतच्या आपल्या आवडत्या भूमिका?
– मी माझ्या सर्वच भूमिकांवर मनापासून प्रेम करतो आणि त्या साकारतो. त्यातही ‘ती रात्र’ मधील भूमिका त्यात मला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर ‘एक डाव धोबी पछाड’मधील भूमिका, ‘रमामाधव’मधील रघुनाथ पेशव्यांची भूमिका, अशा अनेक भूमिका आहेत.
दिग्दर्शकाला अभिनय क्षेत्रातील सर्वच अंगे माहीत असायला हवीत अशा मताचे आपण आहात काय?
– नक्कीच हो. आपण दिग्दर्शन, गायन, अभिनयाशिवाय पुष्कर श्रोत्रींबरोबर केलेला ‘हाय काय नाय काय’ या चित्रपटाचे लेखन केले आहे. दिग्दर्शकाला आपल्या क्षेत्रातील, अर्थात चित्रपट निर्मितीतील सारीच अंगे अवगत असली पाहिजे.

चित्रपट निर्मितीसाठी शासनाचे सहकार्य किती महत्त्वाचे?
– पैसा हा महत्त्वाचाच आणि तो वेळेत मिळणे हे अधिक महत्त्वाचे. शासनाकडून मिळणारे अर्थसाहाय्य हे वेळेवर मिळेलच असे नाही. परंतु चित्रपट हा आपल्याला वेळेत करायचा असतो. इथे कलाकारांचे श्रम लागते. कष्ट, मेहनत लागते. चित्रपट वेळेत करणे हेच आपल्यापुढे आव्हान असते. त्यामुळे चित्रपट तयार करणे आणि तो वेळेत पूर्ण करणे हेच अधिक महत्त्वाचे.

‘कच्चा लिंबू’ सुवर्ण मयुराच्या स्पर्धेत
आपला चित्रपट ‘कच्चा लिंबू’ इफ्फीमधील स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे. हे मराठीचे यश आहे. जगभरातून आलेल्या चित्रपटातील पहिल्या पंधरांमध्ये आपल्या चित्रपटाची स्पर्धेसाठी निवड होणे हे फार मोठे यश आहे. आता डोळे निकालाकडे लागले आहेत. मराठी भाषेची श्रीमंती शब्दांत सांगता येत नाही. आपल्याकडे समृद्ध असे साहित्य असल्याने चांगले आणि दर्जेदार चित्रपट या साहित्यातून तयार होऊ शकतात. ऑस्करपर्यंत मजल मारलेल्या ‘श्‍वास’ चित्रपटाने सारेच बदलले. आणि मराठी चित्रपटाने आपली स्वत:ची अशी वेगळी जागा निर्माण केली. आज आपले चित्रपट सातासमुद्रापार जाऊ लागले आहेत, याचा मराठी माणूस म्हणून आपल्याला फार अभिमान आहे, असे प्रसाद ओक यावेळी म्हणाले.