>> बायणा येथील घटना; अर्भकाच्या माता-पित्याचा शोध सुरू
बायणा येथे कोझी अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर एका सदनिकेबाहेर ठेवलेल्या कचराकुंडीत काल नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ माजली. पालिकेच्या नियमित कचरा उचल करणार्या कामगारांना हे अर्भक कचराकुंडीत आढळून आले. या प्रकरणी मुरगाव पोलिसांकडून अर्भकाच्या माता-पित्याचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालिकेचा एक कामगार नित्यनेमाने दुपारी बारा वाजता सदर अपार्टमेंटमध्ये कचरा उचलण्यासाठी आला असता, तिसर्या मजल्यावरील एका राजस्थानी व्यक्तीच्या सदनिकेबाहेरील कचरा उचलण्यासाठी गेला. त्याने कचराकुंडीतील एक प्लास्टिक पिशवी उघडून पाहिली असता, त्यात एक नवजात अर्भक त्याला दृष्टीसस पडले. त्याने सदर बालक जिवंत आहे की नाही, हे न्याहाळून पाहिले व त्याने लगेच सदनिकेची बेल वाजवली. यावेळी आतून पाच वर्षांची मुलगी आली असता त्या कामगाराने तिला हा कचरा कुणाचा आहे, असे विचारले. तिने तो आपला असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळाने आतून एक महिला बाहेर आली असता, त्या कामगाराने तिला ते नवजात बालक दाखवले. त्या कामगाराने हे बालक कुणाचे, असा सवाल केला. त्यावर तिने आम्हाला ठाऊक नसल्याचे सांगितले.
अखेर कामगारांनी आपल्या ठेकेदाराला याविषयी माहिती दिली असता, त्याने लगेच पोलिसांना सदर प्रकाराची माहिती दिली. मुरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. त्या नवजात अर्भकाचा मृतदेह मडगाव हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, बायणा येथे कोझी अपार्टमेंटमध्ये कचराकुंडीत नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची माहिती वार्यासारखी पसरली आणि तिथे बघ्यांची गर्दी झाली. मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.