कंबरेचे दुखणे… आऊच!

0
35
  • डॉ. मनाली महेश पवार

हल्ली कंबरदुखीचा त्रास अगदी तरुणवयातही सतावू लागला आहे. कधीकधी कंबरदुखी हा एक स्वतंत्र आजार म्हणून त्रास देतो, तर कधी इतर रोगांचे लक्षण म्हणून. तसा कंबरदुखी हा खूप काळ टिकणारा त्रास नाही; पण अगदीच निष्काळजीपणा केला तर तो वाढू शकतो. म्हणून योग्य वेळी योग्य काळजी घेतली पाहिजे!

एकेकाळी कंबरदुखी हा वार्धक्यामध्ये होणारा त्रास असे. पण आता मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा व्यवसायातील अपरिहार्यतेमुळे म्हणा- कंबरदुखीचा त्रास अगदी तरुणवयातही सतावू लागला आहे. कधीकधी कंबरदुखी हा एक स्वतंत्र आजार म्हणून त्रास देतो, तर कधी इतर रोगांचे लक्षण म्हणून. तसा कंबरदुखी हा खूप काळ टिकणारा त्रास नाही; पण अगदीच निष्काळजीपणा केला तर वाढू शकतो. मुख्य म्हणजे हा विकार दाखविताही येत नाही किंवा कामही करू देत नाही.

पुरुषांपेक्षा स्त्रिया कंबरदुखीने जास्त त्रस्त असतात. स्त्रीमध्ये गर्भधारणेच्या वेळी, मातृत्वामुळे कंबरदुखी या विकाराशी तिचे अतूट नाते जुळू शकते. गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात. गर्भाला सामावून घेण्यासाठी मणक्याचे व आटोपोटीचे स्नायू सैल होतात. बाळंतपणाच्या वेळी हा प्रभाव सर्वात जास्त असतो. मग नंतरच्या सहा ते बारा आठवड्यांत हे स्नायू हळूहळू परत घट्ट व्हायला लागतात. या कालावधीत या स्नायूंना योग्य आराम व व्यायाम न मिळाल्यास त्रास वाढतो. स्त्रीचे सिझेरियन करावे लागले तर पोटाच्या स्नायूंवर अधिक भार पडू शकतो. त्यामुळे थोडे जास्त वेळ उभे राहिले किंवा बाळाला दूध पाजण्यासाठी बसल्यावर कंबर दुखायला लागते. वारंवार गर्भारपण आले तर या स्नायूंना घट्ट होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही व हे दुखणे अधिक तीव्र व त्रासदायक होते. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशी दरम्यान हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन तिथे पोकळी निर्माण होते. पूर्वीपासून जर हाडांची मजबुती व घनता समाधानकारक असेल तर या कमतरतेचा विशेष असा परिणाम जाणवत नाही. परंतु अशक्तपणा, शारीरिक व्यायामाचा अभाव या यामुळे हाडांची घनता समाधानकारक नसते. त्यामुळे मणक्यांमध्ये सूक्ष्म फ्रॅक्चर होऊन कंबरदुखी निर्माण होते.

कंबरदुखी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. सततचा प्रवास केल्याने, वर-खाली खडबडीत रस्त्यावर चालण्याने (मॅकॅनिकल बॅक पेन), तसेच सकाळी उठल्या उठल्या होणारी कंबरदुखी ही बऱ्याचवेळा इतर आजारांची निर्देशक असते. उदा. आमवात. याला इन्फ्लॅमट्री पेन (दाहक वेदना) असे म्हणतात.
संध्याकाळी बसून उठल्यावर होणाऱ्या वेदनेचे कारण मणक्यामध्ये असलेले पातळ द्रव (स्पायनल फ्लूड) कमी होते. हे फ्लूड नेहमी शॉक अब्सॉर्बरस्‌‍सारखे काम करत असते. पण हे पाणी कमी झाल्याने स्लीप डिस्क होते.

कंबरदुखीची कारणे
कंबरदुखीची कारणे पाहताना कंबरेची रचना जाणून घेणे आवश्यक. कंबरदुखी ही नेहमी मणक्यामध्ये होते. या भागाला मजबूत असा आधार नसतो. मणके, मज्जातंतू, मांसपेशी, स्नायू इत्यादींनी कंबरेचा भाग बनलेला असतो. वरच्या पाठीला छातीच्या रिब्सचा आधार असतो. त्याचप्रमाणे खाली ओटीपोटीच्या कंबरेचा आधार असतो. पण लंबर भागाला आधार नसल्याने स्नायू-मांसपेशी शिथील होतात, कधी मणक्यांमधील द्रव्य कमी होते, मणक्यातील चकनी बाहेर येते व कंबरदुखीचा त्रास सुरू होतो.
आयुर्वेदशास्त्राप्रमाणे कंबरेचा भाग हे वातदोषाचे स्थान आहे. त्यामुळे वाताचा प्रकोप झाल्यास किंवा वातदोष दूषित झाल्यास वाताचे कार्य बिघडते व त्या भागी वेदना उत्पन्न होते. सतत रुक्ष व गुरू पदार्थांच्या सेवनाने वात दूषित होतो. उदा. बेकरी प्रॉडक्ट्‌‍स, सुके खाणे (बिस्किट, फरसाण आदी), गुरू पदार्थांमध्ये दूध, दुधाचे इतर पदार्थ, मांसाहार इत्यादी, त्याचप्रमाणे अजीर्ण झाले असता खाणे, दिवसा झोपणे, व्यायाम न करणे, या सगळ्या गोष्टींमुळे अपान वायू बिघडतो.

  • त्याचप्रमाणे बसण्याच्या, चालण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे कंबरेच्या मणक्यांवर वजनाचा जास्त ताण येतो. वाढीव वजन व वाढलेले पोट पाठीच्या स्नायूंना जास्त पुढे आणि खाली ओढते. त्यातून सततच्या ताणामुळे वेदना एकदम चालू होते व शरीराची हालचाल करणे अशक्य होऊन जाते.
  • पोटावर किंवा पालथे किंवा एक पाय पोटाशी व एक पाय खाली असे झोपल्याने स्नायू आक्रसून वेदना चालू होते.
  • मऊ गादी, खुर्ची, सोफा इत्यादी बैठकीच्या वापरामुळे पाठीच्या स्नायूंना पुरेसा आधार मिळत नाही. त्यातून मणक्याची नैसर्गिक स्थिती बिघडते. त्यामुळे स्नायूंचे आकुंचन होऊन वेदना सुरू होतात.
  • कंबरेच्या मणक्यांना आघात, इजा, पाठीच्या स्नायूंचा अनैसर्गिक सतत वापर, धक्का बसणे, थंड हवा, उंचावरून पडणे, मणक्यामध्ये गाठ, मानसिक ताण, अस्वस्थता, भावनांचा उद्रेक यामुळे स्नायूंना मुरडा येऊ शकतो.
  • स्त्रियांच्या बाबतीत ओटीपोटीचे आजार किंवा सूज याने कंबरदुखी उद्भवते.
  • दोन मणक्यांमधील मऊ, संरक्षक चकतीची झिज अथवा अपघाताने ती चकती मणक्याबाहेर घसरणे.

कंबरदुखीमध्ये लक्षणे

  • उठता-बसता त्रास होणे.
  • जमिनीवर बसता न येणे.
  • वाकण्याच्या हालचाली मोकळेपणी न करता येणे.
  • स्नायूंमध्ये ताठरपणा येणे.
  • चालताना त्रास होणे.
  • वजन उचलायला न जमणे.
    कंबरदुखी ही एकाच हाडाशी, एकाच मणक्याशी किंवा एकाच स्नायूशी निगडीत नसून कंबरेचे मणके व आजूबाजूचे स्नायू, नसा किंवा मणक्यांमधील चकती इत्यादी सर्वांशी संबंधित असते. त्यामुळे रुग्णाची कंबर नक्की कुठे दुखते हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्या भागातील सूज, ताठरपणा, हालचालीतील मर्यादा व वेदना, विश्रांती घेताना वेदना वाढते का याची दखल घ्यावी लागते.

कंबरदुखीवर उपचार

  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे कंबरदुखीवरील उपचारांत पंचकर्माला खूप महत्त्व आहे. पंचकर्मापैकी ‘बस्ती’ ही वाताची मुख्य चिकित्सा आहे. कटी हे अपानवायूचे मुख्य स्थान. त्यामुळे अनुवासन तेलाने किंवा काढ्याच्या बस्तीने कटीपासून खालील भाग डिटॉक्स करायचा. त्यासाठी तज्ज्ञ वैद्याचा सल्ला घ्यावा. बस्तीने अपान वायूचे शोधन होते व शमनही होते.
  • कटिबस्ती हा स्थानिक चिकित्सेमधला उपक्रम आहे. यामध्ये उडदाच्या पीठाची पाळी बनवून कटीभागी खोलगट असा गोलाकार तयार करतात व त्यामध्ये औषधसिद्ध कोमट तेल ठेवले जाते. असे साधारण दिवसातून दोन वेळा आठ दिवस केल्याने वाताचे शमन होते व कंबरदुखी थांबते.
  • वाताचा आजार असल्याने तेलाच्या स्नेहनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे रोज आंघोळीपूर्वी साधारण अर्धा तास तेल लावावे व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी.
  • स्नेहनानंतर स्वेदनालाही तेवढेच महत्त्व आहे. कंबरदुखीच्या उपचारांमध्ये तेल लावल्यानंतर गरम वाळूची पोटली करून शेकावे.
  • आमवातसारख्या आजारात जेव्हा कंबरदुखी असते तेव्हा तेलाने मालीश करू नये. फक्त गरम वाळूने शेकावे किंवा आंघोळीच्या पाण्यात निर्गुंडीचा, शेवग्याचा किंवा एरंडाचा पाला घालावा व त्याचा चांगला काढा करावा आणि त्या पाण्याच्या टबमध्ये बसावे. याला कटिस्नान म्हणतात. त्याचबरोबर कटिधारा केल्यानेही कंबरेच्या वेदना कमी होतात. कटिधारा म्हणजे वरील पानांचा जो काढा करतात तो तांब्यात घेऊन एक धार धरून वेदना होत असलेल्या भागी ओतावा.
  • वैद्याच्या सल्ल्याने बस्ती, कटिबस्ती, पिण्डस्वेद, तैलधारा इत्यादी उपक्रम करून घ्यावेत.
  • आहारात डिंक, खजूर, दूध, तूप, उडीद, मेथी, सुंठ, ओवा इत्यादीचे सेवन करावे.
  • मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू हे कंबरदुखीवर उपयुक्त ठरतात.
  • अर्जुन चूर्णाचा काढा, दूर्वांचा रस हा कटिवेदनेमध्ये उपयुक्त आहे.
  • नाचणीची पांढरे तीळ लावून भाकरी खावी.
  • सुंठ व गुळाची बोराएवढी गोळी करून तुपासह खावी.

कटिवेदनेमध्ये व्यायामाचे महत्त्व

  • सर्वांगासन, शलभासन, हलासनसारखी योगासने करावी.
  • सकाळी उठल्याजागीच पाठीवर आडवे पडून एका वेळेस एक पाय वर उचलणे व संथ गतीने खाली आणणे असे सोपे व्यायाम प्रथम करावेत.
  • आपले दोन्ही पाय सायकलिंग केल्याप्रमाणे हलवावेत किंवा एक एक करून दोन्ही पायांनी हवेत सावकाश ‘शून्य’ आकडा रेखाटावा.
  • भुजंगासन, नौकासन, धनुरासनसारखी योगासने ही कटिवेदनेमध्ये महत्त्वाची आहेत.
  • पाठीला आराम देणारी योगासने नियमितपणे करण्यास सुरुवात करावी.
  • योगासने करण्यास जमत नसतील तर सोपे व्यायामप्रकार करावे.
  • पूर्ण सरळ वा पालथे झोपण्यापेक्षा छोटी उशी घेऊन, गुडघे थोडे दुमडून एका कुशीवर निजणे हे मणक्यांसाठी सर्वात आरामदायी आहे.
  • लाकडाच्या किंवा लोखंडाच्या कडक पलंगावर कापसाची गादी टाकून झोपावे.
  • औषधांमध्ये विषतिंदुक वटी, दशमुलारिष्ट, सिंहनाद गुग्गुळ यांसारखी औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावीत.