राज्यातील कंत्राटी रोजगार पध्दत नष्ट करण्याच्या व गोवा भरती रोजगार सोसायटीतर्फे भरती केलेल्या सर्व कामगारांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी गोवा कामगार महासंघाच्या हजारो कामगारांनीे दि. १ डिसेंबर रोजी येथील कॅसिनो जेटीसमोर उपोषण करण्याचे ठरविले आहे, अशी माहिती गोवा कामगार महासंघाचे अध्यक्ष अजिंतसिंह राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.महासंघाने १४ मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले आहे. गेल्या ऑगस्ट मध्येही निवेदन सादर केले होते. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ कामगारांनी आंदोलनाचा मार्ग पत्करण्याचे ठरविले आहे, असे राणे यांनी सांगितले. गोवा रोजगार भरती सोसायटी बरखास्त करून सर्व कर्मचार्यांना गोवा मनुष्यबळ विकास खात्यात सामावून घ्यावे व नोकर्यात कायम करावे, अशी मागणी त्यांनी केली.
वरील भरती-रोजगार सोसायटीला सरकारतर्फे प्रती कामगारांमागे १३ हजार रुपये दिले जातात. प्रत्यक्षात सोसायटीतर्फे भरती केलेल्या कामगारांना प्रत्येकी ४९०० रुपये वेतन दिले जाते. गेल्या चार महिन्यांचे वेतनही कर्मचार्यांना मिळाले नाही. त्याची चौकशी करण्याची मागणी राणे यांनी केली. पत्रकार परिषदेत महासंघाशी संलग्न असलेल्या भरती रोजगार सोसायटीचे उपाध्यक्ष रंगनाथ जाधव, सरचिटणीस महेंद्र वाघुर्मेकर उपस्थित होते.