औषधी रानभाज्या

0
85
  • डॉ. मनाली महेश पवार

बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहार-विहारामध्ये बदल करताना धान्य-कडधान्यांमध्येही ऋतूप्रमाणे बदल करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. ज्या ऋतूमध्ये जी फळे पिकतात तीच खावीत, तसेच भाज्याही ऋतुमानाप्रमाणे खाव्यात. पावसाळ्यात पालेभाज्या विशेषतः खाऊ नयेत; पण रानभाज्या ज्या पावसाळ्यात उगवतात त्यांचे मात्र नक्की सेवन करावे. या रानभाज्या विविध आरोग्यदायी गुणांनी युक्त असतात.

बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपल्या आहार-विहारामध्ये बदल करताना धान्य-कडधान्यांमध्येही ऋतूप्रमाणे बदल करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. ज्या ऋतूमध्ये जी फळे पिकतात तीच खावीत, तसेच भाज्याही ऋतुमानाप्रमाणे खाव्यात. पावसाळ्यात पालेभाज्या विशेषतः खाऊ नयेत; पण रानभाज्या ज्या पावसाळ्यात उगवतात त्यांचे मात्र नक्की सेवन करावे. या रानभाज्या विविध आरोग्यदायी गुणांनी युक्त असतात. ज्याप्रमाणे या भाज्या शरीराचे पोषण करतात, त्याचप्रमाणे या भाज्या औषधी गुणांनीदेखील युक्त असतात.
पावसाळा सुरू झाला की बहुतांश ठिकाणी रानभाज्यांना बहर येतो. या रानभाज्या विशेष अशी मेहनत न घेता निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. या भाज्यांच्या निवडीविषयी थोडेसे ज्ञान घेऊन या भाज्यांचा आस्वाद घेता येईल. या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असतात.
कोकणात साधारण तीन हजार रानभाज्या आढळून येतात. पण काही थोड्याशा जरी आपल्या आजूबाजूला उगवणाऱ्या रानभाज्यांची माहिती आपल्याला असेल व त्या जाणीवपूर्वक आपण सेवन केल्या तर पावसाळ्यातील कितीतरी आजारांत त्या उपयुक्त ठरतील.

टाकळा
टाकळा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती 30 ते 65 सें.मी. उंच वाढते. ही भाजी माळरानावर, रस्त्याच्या कडेला, शेतजमीन, परसबागेत तसेच पडीक जमिनीवर सर्वत्र वाढलेली दिसते. याची पाने संयुक्त, एका आड एक, 7 ते 9 सें.मी. लांब, लांबट गोल पर्णिकाच्या 3 जोड्या असून खालची जोडी सर्वात लहान तर वरची जोडी मोठी असते. या भाजीला उग्र वास येतो म्हणून जनावरं खात नाहीत. पण याची भाजी मात्र चविष्ट लागते.
औषधी गुणधर्म

  • टाकळ्याची पाने, बिया औषधात वापरतात. त्वचारोगांमध्ये टाकळ्याला अग्रगण्य मानले जाते. त्यामुळे त्वचारोग झालेल्यांनी ही भाजी अवश्य खावी.
  • पूर्ण झाडाचा उपयोग सोरायसिस, खरुज यांसारख्या त्वचाविकारांत केला जातो.
  • पानांचा काढा दात येण्याच्या वेळी मुलांना दिला जातो.
  • लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी टाकळ्याची भाजी अतिशय उपयुक्त आहे.
  • ही भाजी गुणाने उष्ण असल्याने वात व कफदोषांमध्ये खाल्ली जाते.
  • पावसाच्या पहिल्या सरीनंतर टाकळ्याची दोन-दोन पाने वर येताना दिसतात. तीच पाने भाजी करण्यासाठी योग्य असतात.
  • ही भाजी हृदयाला हितकर असते. श्वास, कास, कुष्ठ, खाजनाशक, गुल्म, कृमीनाशक इ. गुणांनी हा टाकळा युक्त असतो.
  • शरीरातील मेद कमी करण्यासाठीदेखील ही भाजी उत्तम आहे.
  • महिलांच्या रक्तप्रदर व श्वेतप्रदर यांवर पाच ते दहा ग्रॅम मुळी तांदळाच्या धुवणातून द्यावी.
  • मधुमेहामध्येदेखील टाकळ्याच्या मुळीचा काढा हितकर आहे.

तांदुळजा
ही भाजी ‘सी’ जीवनसत्त्वाने युक्त असते. ही भाजी मधुर रसाच्या गुणांनी समृद्ध आहे.

  • गोवर, कांजण्या, हिवतापात ही भाजी फार उपयुक्त ठरते.
  • नाजूक प्रकृतीच्या व्यक्तींकरिता, बाळंतीण, गरोदर स्त्रिया यांच्यासाठी वरदान आहे.
  • डोळ्यांच्या विकारांत आग होणे, खाज सुटणे, पाणी येणे, डोळे चिकटणे या तक्रारींकरिता फार उपयुक्त आहे.
  • जुनाट मलावरोध विकारात आतड्यांना चिकटून राहिलेला मळ सुटा व्हायला तांदुळजा भाजी उपयुक्त आहे.

करटोली
करटोली ही डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे.

  • ही भाजी अनेक पोषकतत्त्वांनी युक्त आहे.
  • ही भाजी कारल्यासारखी दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते.
  • या भाजीमध्ये व्हिटामिन डी, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्त्वे आढळतात.
  • ही भाजी अत्यंत चविष्ट लागते. या भाजीपासून शरीराला मोठ्या प्रमाणात शक्ती मिळते.
  • आयुर्वेदशास्त्राप्रमाणे ही भाजी डेकेदुखी, केस गळती, कानदुखी, खोकला, पोटात इंफेक्शन, मूळव्याध, खरुज, अर्धांगवायू, ताप, बेशुद्ध पडणे, सापाने दंश करणे, कँसर, ब्लडप्रेशर यांसारख्या अनेक आजारांवर उपयुक्त ठरते.
  • या वेलवर्गीय वनस्पतीची मुळे, फुले, रस, पाने इत्यादीचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर उपचारांसाठी केला जातो.

कुर्डू
कुर्डू ही वनस्पती सहसा दलदलीच्या ठिकाणी आणि तण म्हणून वापरण्यायोग्य नसलेल्या जमिनीवर उगवते. कोमल पाने भाजी म्हणून वापरली जातात. याची पाने आणि बिया औषधी मूल्यांनी युक्त असतात.

  • गावातील लोक कुर्डू बारीक चिरतात किंवा ठेचून त्यात शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या घालून भाजी करतात. काही लोक कोवळी पाने वाफवून, त्यात कांदा आणि स्थानिक मसाला घालून भाजी तयार करतात.
  • ही भाजी प्रथिने आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असते.
  • काही ठिकाणी मासिक पाळीच्या काळात ही भाजी खात नाहीत.
  • बिया ताप आणि तोंडाच्या फोडांवर वापरल्या जातात.
  • किडनी स्टोनवर या वनस्पतीच्या बियांचा वापर होतो.
  • बिया अतिसार, लघवीच्या त्रासात, पित्तशमनासाठी उपयुक्त असतात.
  • देठ आणि पाने पौष्टिक म्हणून फोड, जखमा आणि त्वचेच्या उद्रेकावर याचा उपयोग केला जातो.
  • पारंपरिक औषधांमध्ये ही भाजी फोड, अल्सर आणि त्वचेचा उद्रेक यांमध्ये वापरली जाते.

भारंगी
चतुर्भुज देठ आणि फांद्या, काहीसे वृक्षाच्छादित झुडूप सर्वत्र प्रचलित आहे.

  • याची मुळे, देठ आणि पाने औषधी गुणांसाठी वापरली जातात.
  • भारंगी ही सामान्यपणे सर्दी, जुनाट सायनस, खोकला आणि श्वसनाचे विविध आजार यांसारख्या समस्यांवर उपयुक्त आहे.
  • ही वनस्पती कोरड्या खोकल्यावर प्रभावी औषध आहे.
  • भारंगीच्या पानांचा रस वापरल्याने त्वचेचे आजार आणि फोडांपासून आराम मिळतो.
  • भारंगी हे फुफ्फुसामधून श्लेष्मा बाहेर काढण्यात मदत करते. सामान्य सर्दी, नासिकाशोध आणि क्षयरोगावर याची भाजी उपयुक्त आहे.
  • भारंगी जळजळ कमी करण्यास मदत करते.
  • भारंगीच्या मुळापासून बनवलेली पेस्ट सौम्य ते गंभीर डोकेदुखीमध्ये उपयुक्त आहे.
  • बऱ्या होत नसलेल्या जखमादेखील या भाजीच्या सेवनाने बऱ्या होतात किंवा पानांची पेस्ट बाधीत जखमांमध्ये भरावी.
  • भारंगी एक नैसर्गिक वेदनाशामक औषध आहे. त्यामुळे सांधेदुखीमध्ये उपयुक्त आहे.
  • भारंगीच्या पानांपासून बनवलेला एक डिकोक्शन कृमी, विशेषतः आतड्यांमध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या कृमींना काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे.
    अशा या विविध रानभाज्या. या पावसाळ्यात आढळतात. त्यांचा नक्की आहारात समावेश करावा.