औषधी तुळशीचे असेही फायदे

0
350
  • डॉ. टीना डायस
    (हेल्थ-वे हॉ.)

आयुर्वेदानुसार तुळशी रोगप्रतिकार, श्वसन व पाचक प्रणाली बळकट करण्यास मदत करते आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. चिंता, तणाव, थकवा कमी करण्यासाठी औषधी तुळशीचा रस किंवा त्याचा काढा करून प्यावा.

तुळशीला औषधी वनस्पतींमध्ये पवित्र तुळस म्हणून ओळखले जाते. औषधी गुणांमुळे आयुर्वेदात तुळशीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तुळस घरात असेल तर केवळ सकारात्मक ऊर्जाच प्राप्त होते असे नाही तर बर्‍याच आजारांपासून आपल्याला सुटकादेखील मिळते. तिच्यातील अनेक औषधी गुणधर्मांमुळे गंभीर रोगांशीदेखील सामना करणं सोपं होतं म्हणूनच तिला ‘क्वीन ऑफ हर्ब्ज’ म्हटलं जातं.

तुळशीचे विविध प्रकार आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. कृष्णा किंवा श्यामा तुळशीचे खोड, पाने व मंजिर्‍या कमी-अधिक प्रमाणात गडद जांभळ्या रंगाची असतात. उन्हात वाढलेल्या व जुन्या झाडांमध्ये हा रंग जास्त ठळकपणे उठून दिसतो. याच तुळशीला ‘काळी तुळस’ असेही संबोधले जाते. राम तुळस ही मोठ्या पानांची, उंच व रानटी पद्धतीने वाढणारी तुळस आहे. या तुळशीच्या पानांना लवंग सदृश, मसालेदार असा सुवास येतो. पोटाच्या विकारासाठी ही तुळस उपयोगी आहे. या तुळशीला लवंगी तुळस असेही संबोधले जाते. वन तुळस ही अतिशय तीव्र असा सुवास असलेली, विशेष औषधी आहे. पानांचा चोथा त्वचाविकारांवर वापरला जातो. तसेच न भरणार्‍या जखमांवरही हा पाला लावला जातो. कापूर तुळशीच्या पानांना कापराचा सुगंध येतो ज्यामुळे कीटक व डास याच्यापासून दूर राहतात.

तुळशीचे फायदे –
आयुर्वेदानुसार तुळशी रोगप्रतिकार, श्वसन व पाचक प्रणाली बळकट करण्यास मदत करते आणि त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पाने अँटीऑक्सिडेंट्‌सने भरलेली असतात जी एकूणच निरोगीपणाला प्रोत्साहन देतात. चिंता, तणाव, थकवा कमी करण्यासाठी औषधी तुळशीचा रस किंवा त्याचा काढा करून प्यावा. त्यातील हर्बल फॉर्म्युलेशनमुळे दमा, ब्रॉंकायटीस, सर्दी आणि फ्लूसारख्या श्वसनविषयक समस्येच्या उपचारातही तुळस मदत करू शकते. तसेच शरीरातील सूज कमी करते. तुळशीच्या थेंबामध्ये युजेनॉल, सिट्रोनेल आणि लिनालूलसह एंझाइम प्रतिबंधित तेले असतात ज्यामुळे ती दाह-विरोधी आहे. तुळशीची पाने थेट सेवन करणे चांगले नाही. गर्भवती महिला, मधुमेह आणि यकृत आजार असलेल्या व्यक्तींनी हे टाळले पाहिजे कारण ते औषधांमध्ये व्यत्यय आणू शकते. त्याऐवजी एक ग्लास पाण्यात मिसळलेल्या तुळशीचे थेंब शरीराला त्याचे लाभ अधिक मिळवून देतात.

तुळशीमध्ये ओरेंटिन आणि व्हॅसिनिन हे दोन पाण्यात विरघळणारे फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडन्ट्‌स आहेत ज्यामुळे रोगापासून बचाव होतो आणि त्वचेची वृद्धी होऊ शकते. जखमेच्या बरे होण्याच्या क्षमतेमुळे त्वचेच्या उपचारामध्ये आणि त्वचेची काळजी घेण्यासाठीही याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ही एक्झीमा बरे करते.
तुळशी दंतसमस्यांमध्ये मदत करते आणि एखाद्याचा श्वास ताजा ठेवू शकते. यात अँटीबायोटिक, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-कार्सिनोजनिक गुणधर्मसुद्धा आहेत.
कोविडपासून बरे झालेले रुग्ण सामान्यतेशी जुळवून घेताना आयुर्वेदाचा उपयोग डोकेदुखी, थकवा आणि मानसिक तणावावर उपचार करण्यासाठी करू शकतात.