औरंगजेबाचा मुद्दा हा आता कालबाह्य झाला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, अशा स्पष्ट शब्दांत आरएसएचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेबाचा मुद्दा आणि नागपूरमध्ये घडलेल्या हिंचारावर संघाची भूमिका स्पष्ट केली.
औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात सोमवारी रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नानंतर यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.