औद्योगिक वसाहतींत महिलांसाठी 5 वसतिगृहे

0
4

आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांची माहिती

गोवा औद्योगिक विकास महामंडळातर्फे (आयडीसी) राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी पाच वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. वेर्णा येथे दोन आणि मडकई, तुये आणि कुंकळ्ळी येथे प्रत्येकी एक वसतिगृहे बांधण्याची योजना आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.

प्रत्येक वसतिगृहामध्ये 120 महिला रहिवाशांना सामावून घेतले जाणार आहे. पीपीपी मॉडेल अंतर्गत 30 वर्षांच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीसाठी वसतिगृहांचे संचालन आणि देखभाल केली जाईल. वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील वसतिगृहासाठी 31 कोटी रुपयांची निविदा मार्च 2025 रोजी काढण्यात आली आहेत. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आणि परवडणारी निवास व्यवस्था प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पाला केंद्रांच्या विशेष साहाय्याकडून राज्यांना भांडवली गुंतवणूक (सास्की) 2024-25 योजनेतून निधी मिळण्याची अपेक्षा आहे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.
राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन सोडविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे 80 टक्के मागण्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. राज्य सरकार राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये मूलभूत आणि पायाभूत सुविधांवर 200 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे, अशी माहिती रेजिनाल्ड यांनी दिली.

राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगवृध्दीसाठी आवश्यक वातावरण तयार केले जात आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत 24 नवीन कामांना मान्यता देण्यात आली आहे. कचरा समस्या सोडविण्यासाठी कचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत. तसेच, प्रदूषणावर नियंत्रणासाठी सांडपाणी निचरा प्रकल्प उभारले जाणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.