ओसीआय कार्डधारकांची भाजपकडून फसवणूक

0
16

>> काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांचा आरोप

सत्ताधारी भाजपने राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोमंतकीयांना आणि विशेष करून सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती बांधवांना ओसीआय कार्डधारकांच्या समस्येचे निराकरण करण्याचे जे आश्वासन दिले होते, ते खोटे होते हे 30 एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्रालयाने जे शुद्धीपत्रक जारी केले होते, त्यावरून सिद्ध झाल्याचे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

हे शुद्धीपत्रक भाजपने गोव्यात मतदान होईपर्यंत उघड होऊ दिले नाही, असे सांगून या शुद्धीपत्रकामुळे सत्ताधारी भाजपचा खोटारडेपणा उघड झाल्याचा आरोप काल फेरेरा यांनी केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सासष्टी तालुक्यातल मतदारांशी संवाद साधताना, तसेच पत्रकार परिषदांतून बोलताना वेळोवेळी ओसीआय कार्डधारकांची समस्या सोडवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. आता केंद्र सरकारने याबाबत खोटारडेपणा केल्याचे उघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत खुलासा करावा, अशी मागणी फेरेरा यांनी केली.
आयवन फर्नांडिस यांच्यासह दोघा जणांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती, असे सांगून सुनावणीच्यावेळी ओसीआयबाबत न्यायालयात खोटी माहिती देऊन गोवा सरकारने न्यायालयाचाही अवमान केल्याचा आरोप फेरेरा यांनी यावेळी केला.