>> दुसर्यांदा जिंकला यूएस ओपन किताब
जपानच्या नाओमी ओसाकाने पहिला सेट गमावल्यानंतर बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाला पराभूत करत यूएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ओसाकाचे हे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. फ्लशिंग मिडोजवरील आर्थर ऍश कोर्टवर एक तास ५३ मिनिटे चाललेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चौथ्या मानांकित ओसाकाने अझारेंकाचा १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. ३१ वर्षीय अझारेंकाने २६ मिनिटांच्या पहिल्या सेटमध्ये सहज विजय मिळविला होता. या सेटमध्ये ओसाकाने तब्बल १३ टाळता येण्यासारख्या चुका केल्या. दुसर्या सेटमध्ये अझारेंका २-० अशी आघाडीवर होती. ओसाकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस दोनवेळा भेदत ४-३ अशी आघाडी घेतली. सूर गवसलेल्या ओसाकाने यानंतर तिसर्यांदा अझारेंकाची सर्व्हिस भेदत दुसरा सेट आपल्या नावे केला. तिसर्या सेटच्या चौथ्या गेममध्ये ओसाकाने अझारेंकाची सर्व्हिस मोडत ३-१ अशी दोन गुणांची आघाडी घेतली. अझारेंकाने यानंतर सामन्यात पुनरागमनाची सुवर्णसंधी दवडली. ४०-० अशा आघाडीवरून अझारंेंकाने तीन ‘ब्रेक पॉईंटस्’ वाया घालवल्यामुळे ओसाका हिने आपली आघाडी ४-१ अशी फुगवली. अझारेंकाने यानंतर चार ब्रेक पॉईंटस् वाचवत पिछाडी २-४ अशी कमी केली. अझारेंकाने सातव्या गेममध्ये ओसाकाची सर्व्हिस भेदताना ३-४ अशी गुणसंख्या केली. परंतु, पुढील गुणासाठी अझारेंकाला स्वतःची सर्व्हिस राखता आली नाही. यानंतर ओसाकाने शेवटचा गुण घेत जेतेपदाला गवसणी घातली.
यापूर्वी ओसाकाने २०१८ मध्ये यूएस ओपन आणि २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. व्हिक्टोरिया अझारेंकाला तिसर्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा. याआधी २०१२ आणि २०१३ च्या यूएस ओपनमध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण दोन्ही वेळा तिला उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. २५ वर्षांनंतर यूएस ओपनमध्ये प्रथमच अंतिम सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर एका महिला खेळाडूने विजेतेपद जिंकले. यापूर्वी १९९४ मध्ये अरांत्जा सांचेझ विकारियोने स्टेफी ग्राफचा पराभव करत या चषकावर नाव कोरले होते.
१९६८ साली ओपन एराला प्रारंभ झाल्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट ६-१ किंव ६-० असा गमावून विजेेतेपदाला गवसणी घातलेली ओसाका ही चौैथी महिला खेळाडू आहे. ट्रेसी ऑस्टिन (वि. मार्टिना नवरातिलोवा, १९८१ यूएस ओपन), सांचेझ विकारियो (वि. स्टेफी ग्राफ, १९९४ यूएस ओपन) व जेनिफर कॅप्रियाती (वि. किम क्लाईस्टर्स, २००१ फ्रेंच ओपन) या अन्य तीन खेळाडू आहेत.