ओशेलमध्ये दोन रशियन युवतींचा मृत्य

0
62

बार्देश तालुक्यातील ओशेल, शिवोली येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघा रशियन पर्यटक युवतींचा मृत्यू झाला. ह्या दोन्ही घटना काल शुक्रवारी उघडकीस आल्या. यातील एका युवतीने गळफास लावून आत्महत्या केली तर दुसर्‍या युवतीचा अतिमद्यप्राशनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हणजूण पोलीस निरीक्षक सूरज गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही युवती मृत झाल्याची माहिती शिवोली आरोग्य केंद्राकडून मिळाली. बंदीरवाडो-ओशेल शिवोली येथे भाड्याच्या घरात एकाटेरीना टिटोवा (३४) ही रशियन युवती आपल्या मैत्रिणीसोबत राहात होती. गुरुवार दि. १९ रोजी पहाटेपर्यंत त्यांचे मद्यपान सुरू होते. त्यानंतर एकाटेरीना ही बेडरूममध्ये झोपण्यास गेली.

सायंकाळी उशिरा एकाटेरीना हिला तिची मैत्रीण उठवायला गेली असता तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मैत्रिणीने दार उघडून आत पाहिले असता एकाटेरीना मृतावस्थेत आढळली. हणजूण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, ओशेल-शिवोली येथे अन्य एका भाड्याच्या घरात आलेक्झांड्रा री डजावी (२४) या रशियन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही युवती व तिचा एक मित्र भाड्याच्या खोलीत २६ जुलैपासून एकत्र राहात होते. दि. १९ रोजी सकाळी १० वा. तिचा मित्र घरातून बाहेर पडला. तो सायंकाळी ६ च्या सुमारास खोलीवर परत आला. त्यावेळी आलेक्झांड्रा दार उघडत नसल्याने त्याने छतावरून व्हरांड्यातून आत प्रवेश करून पाहिले असता आलेक्झांड्रा हिने गळफास घेतल्याचे आढळले.

आलेक्झांड्रा ही मनोरुग्ण होती व तिच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती तिच्या या मित्राने दिली. उपनिरीक्षक महेश केरकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.