‘ओबेसिटी वॉरियर्स’ करणार लठ्ठपणाविषयी जनजागृती

0
2

>> पंतप्रधानांकडून क्रीडा, राजकीय, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील 10 मान्यवरांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशातील लठ्ठपणाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मोदींनी राजकारण, क्रीडा, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील 10 मान्यवरांची नावे त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर काल जाहीर केली. देशातील लठ्ठपणाची समस्या कमी करणे आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणातील खाद्यतेलाचा वापरही कमी करणे या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत जनजागृतीपर उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या 10 जणांना मोदींनी निवडले आहे. लठ्ठपणामुळे अनेक अन्य आजारही जडतात. त्यामुळे ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर महिन्याला होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात रविवारी या संदर्भातील उल्लेख केला होता. एका अभ्यासानुसार आजच्या घडीला प्रत्येक आठ माणसांपैकी एक व्यक्ती ही लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे; पण याहून जास्त काळजीची बाब म्हणजे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अनेक पटींनी वाढताना दिसत आहे, असे मोदींनी मन की बातमध्ये नमूद केले होते.
लठ्ठपणा आणि अतिरिक्त वजनामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार उद्भवतात. आपण सगळे मिळून थोडी मेहनत केल्यास या समस्येचा सामना करू शकतो. त्यात एक पर्याय मी सुचवला की रोजच्या जेवणातला खाद्यतेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करा. तुम्ही तेल खरेदी करतानाच 10 टक्के कमी तेल खरेदी करून हे साध्य करू शकता, असेही मोदी म्हणाले होते.

देशातील लठ्ठपणाची समस्या करण्यासाठी पंतप्रधानांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाविरोधातल्या या लढ्यासाठी राजकारण, क्रीडा, उद्योग आणि मनोरंजन या क्षेत्रांतल्या एकूण 10 मान्यवरांना नॉमिनेट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला यादीतील मान्यवरांनी प्रतिसाद दिला असून, ओमर अब्दुल्ला यांनी या उपक्रमात आनंदाने सहभागी होत असल्याचे नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लठ्ठपणाविरोधात सुरू केलेल्या या मोहिमेचा भाग व्हायला मला नक्कीच आवडेल. लठ्ठपणामुळे हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह, श्वसनाचे आजार, नैराश्य अशा व्याधी उद्भवतात, असे अब्दुल्ला यांनी नमूद केले आहे.

  1. आनंद महिंद्रा – उद्योगपती
  2. दिनेश लाल यादव – अभिनेते
  3. मनू भाकर – नेमबाज
  4. मीराबाई चानू – वेटलिफ्टर
  5. मोहनलाल – अभिनेते
  6. नंदन निलेकणी –
  7. ओमर अब्दुल्ला – मुख्यमंत्री
  8. आर. माधवन – अभिनेते
  9. श्रेया घोषाल – गायिका
  10. सुधा मूर्ती – खासदार