ओबामांचे आज आगमन

0
91
खास विमानाने पत्नी मिशेलसह अमेरिकेतून भारताकडे रवाना होताना बराक ओबामा.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काल सायंकाळी अमेरिकेतून तीन दिवसांच्या भारत दौर्‍यावर रवाना झाले आहेत. जर्मनीत विश्रांती घेऊन आज सकाळी १० वाजता त्यांचे खास एअरफोर्स वन विमान नवी दिल्लीतील पालमस्थित मिलिट्री एयरबेसवर उतरेल. दरम्यान, ‘व्हाइट हाऊस’ने बराक ओबामांच्या दौर्‍याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तीन दिवसांच्या भारत दौर्‍यात कपात करून ओबामा सौदी अरेबियात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौदी अरेबियाचे किंग अब्दुल्ला यांचे शुक्रवारी निधन झाले असून ओबामा तेथे जाऊन शोक व्यक्त करणार आहेत.
ताजमहल दर्शन रद्द
व्हाइट हाऊसने जारी केलेल्या सुधारित वेळापत्रकात ओबामांची पत्नी मिशेलसोबत आग्रा भेट रद्द झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतून रवाना होण्यापूर्वी ओबामांनी आग्रा येथे जाता येणार नसल्याने खेद व्यक्त केला आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने यूपी सरकारला ओबामांची आग्रा भेट रद्द झाल्याचे कळविले आहे.
ओबामा आपल्या तीन दिवसांच्या दौर्‍या दरम्यान सात वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान मोदी शिष्टाचार मोडून स्वत: बराक ओबामांच्या स्वागतासाठी जाणार आहेत.
ओबामांची
‘द बीस्ट’ कार
भारतात फिरताना ओबामा स्वत:ची ‘द बीस्ट’ ही कार वापरणार आहेत. या कारची तुलना चार चाकांचा रणगाड्याशी करता येईल. जनरल मोटर कंपनीने तयार केलेली ही कार १८ फूट आणि १० इंच उंच असून आठ इंच जाडीच्या आर्मर कवचाने सुसज्ज आहे. गाडीच्या बुलेटप्रुफ काचांची जाडी तब्बल पाच इंच इतकी आहे. त्यामुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना केमिकल शस्त्रांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळते. ही गाडी स्टील, ऍल्युमिनियम, तसेच सिरॅमिकचा वापर करून बनवण्यात आली असून या गाडीच्या खाली बॉंब ठेवून जरी स्फोट केला तरी ती सुरक्षित राहील. गाडीच्या दरवाजांचे वजन बोईंग – ७५७ या विमानाच्या दरवाज्यांइतके आहे.