मगो पक्षातर्फे येत्या २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. ओपा-खांडेपार येथे म्हादई आणि मांडवीच्या संगमावर म्हादई बचाव जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केले.
मगो पक्षाच्या म्हादई बचाव जागृती अभियानाचा शुभारंभ रविवारी सत्तरी तालुक्यातील उस्ते येथे करण्यात आला असून या जनजागृती कार्यक्रमाला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे आमदार ढवळीकर म्हणाले.
म्हादई प्रश्नावर सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करणार्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आभार मानले पाहिजे. आत्ताच म्हादईसाठी लढा देण्याची नितांत गरज आहे. म्हादईचे पाणी वळविल्यास गोव्याची मोठी हानी होणार आहे. राजकीय पक्षांबरोबरच सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी म्हादई बचाव आंदोलनात सहभागी होण्याची गरज आहे. ओपा खांडेपार येथील २७ एमएलडी नवीन पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले असले तरी नदीच्या पात्रातील पाण्याचे प्रमाण एप्रिल, मे महिन्यात कमी होत असल्याने पणजी परिसरात सुरळीत पाणीपुरवठ्याबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याचे ढवळीकर म्हणाले.