ओडिशा – चेन्नईनचा आगेकूच करण्याचा प्रयत्न

0
133

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) येथील कलिंगा स्टेडियमवर सोमवारी ओडिशा एफसी आणि चेन्नईन एफसी यांच्यात लढत होत आहे. गुणतक्त्यात आगेकूच करण्यासाठी दोन्ही संघांना विजयाची गरज असेल.

ओडिशाला जिंकल्यास चौथ्या क्रमांकावरील मुंबई सिटीविरुद्धची पिछाडी एका गुणापर्यंत कमी करता येईल. स्पर्धेचा निर्णायक टप्पा आता सुरु होत असल्यामुळे जोसेप गोम्बाऊ याच्या संघाला कामगिरीत घसरण होणे परवडणार नाही.चेन्नईनसाठी सुद्धा तीन पेक्षा कमी गुण मिळाले तर पहिल्या चार संघांच्या तुलनेत पिछाडी वाढेल. ते नऊ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहेत. जिंकल्यास ते सहाव्या क्रमांकावरील ओडिशाला गाठू शकतील.

गोम्बाऊ चेंडूवर ताबा ठेवण्याच्या शैलीला प्राधान्य देतात. त्यांना मिळालेले निकाल मात्र संमिश्र आहेत. मागील लढतीत जमशेदपूरविरुद्ध २-१ असा विजय मिळाल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावलेले असेल. फॉर्म कायम राखण्यास ते प्रयत्नशील असतील.
गोम्बाऊ यांच्या संघाची सेट-पिसेसवरील कामगिरी मात्र ढिसाळ होत आहे. त्यांना असे केवळ दोन गोल करता आले आहे. हे संयुक्त निचांकी प्रमाण आहे. बचावाची आकडेवारी आणखी निराशाजनक आहे. त्यांच्याविरुद्ध १५ पैकी सात गोल सेट-पिसेसवर झाले आहेत, जे प्रमाण सर्वाधिक आहे. अशावेळी कार्लोस डेल्गाडो याच्यासारख्या खेळाडूला बचाव फळीची जबाबदारी सक्षमपणे पेलावी लागेल.
आघाडी घेतल्यानंतर ती राखण्यासही ओडिशा झगडत आहे. साधारणपणे पहिल्या सत्रात त्यांची कामगिरी सरस होते, पण दुसर्‍या सत्रात प्रतिकार थंडावतो. त्यांचे १३ पैकी केवळ पाच गोल दुसर्‍या सत्रात झाले आहेत. दुसरीकडे त्यांच्याविरुद्ध १५ पैकी १० गोल दुसर्‍या सत्रात झाले आहेत. ओडिशाच्या संघ व्यवस्थापनाला या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना करावी लागेल.

चेन्नईनसाठी सलग विजय मिळविणे डोकेदुखी ठरले आहे. नऊ सामन्यांत त्यांना दोनच विजय मिळाले आहेत. गेल्या मोसमाच्या प्रारंभापासून त्यांना सलग दोन सामने जिंकता आलेले नाहीत. ओवेन कॉयल यांच्याकडे प्रशिक्षकपद आल्यापासून तीन सामन्यांत हा संघ क्लीन-शीट राखू शकलेला नाही. ल्युचियन गोऐन याच्यासारख्या खेळाडूला सातत्य राखता आलेले नाही. याचा संघाला फटका बसला आहे. एली साबिया मात्र निलंबन संपल्यामुळे उपलब्ध असेल.

चेन्नईनचे आक्रमण रॅफेल क्रिव्हेलारो याच्यावर अवलंबून असेल. ब्राझीलच्या या खेळाडूने गेल्या तीन सामन्यांत अप्रतिम खेळ केला आहे. चार गोलांमध्ये त्याचा वाटा राहिला असून मोसमात २१ टक्के संधी त्याने निर्माण केल्या आहेत. या बाबतीत गोव्याच्या ब्रँडन फर्नांडीस याच्यानंतर तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. चेन्नईन यंदा प्रतिस्पर्ध्याच्या मैदानावर अद्याप जिंकलेला नाही. सोमवारी त्यासाठी उत्तम संधी असेल. दुसरीकडे ओडिशा कलिंगा स्टेडियमवर सलग दुसर्‍या विजयासाठी सज्ज होऊन प्रयत्न करेल.