>> रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर
ओडिशामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर काल तब्बल 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना झाली. या रेल्वे अपघातानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू असून अपघातस्थळी रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी उपस्थित राहून या कामावर देखरेख केली.
ट्रॅक दुरुस्तीबाबत बोलताना मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, दोन्ही बाजूंनी रेल्वे वाहतुकीसाठी ट्रॅक पूर्णपणे तयार झाला असून मोकळा करण्यात आला आहे असे सांगून आमची जबाबदारी अजून संपलेली नाही असे सांगताना ते भावुक झाले. ओडिशा रेल्वे अपघातातील अनेकजण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांना लवकरात लवकर त्यांच्या नातेवाइकांना भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर सापडावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आमचे कर्तव्य अजून संपलेले नाही असे सांगितले.
तीन गाड्या रवाना
रेल्वे रूळ दुरुस्त झाल्यानंतर रुळावरून वाहतूक सुरू झाली असून तीन गाड्या रवाना झाल्या आहेत. रात्री सात गाड्या रवाना होणार आहेत. अशी माहिती रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी दिली.
अपघातात 288 जणांचा मृत्यू
दि. 2 जून रोजी ओडिशामध्ये तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या भीषण रेल्वे अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला तर, 1000 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सध्या शेकडो जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी दिले आहे.
51 तासांनी ट्रेन धावली
ओडिशाच्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरून मालगाडीही रवाना झाली.