- अनुराधा गानू
(आल्त-बांबोळी, सांताक्रुझ)
आम्ही कसले सुधारतोय. त्या कुंड्यांच्या पुढे कचरा टाकायला सुरुवात केली आणि शिवाय कचरा टाकायच्या नवीन नवीन जागाही शोधून काढल्या आणि स्वच्छतेचे तीन तेरा वाजवले.
आपण भारतीय संस्कृतीचे वारसदार. खरं आहे. श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’. म्हणजे आपलं काम आपण करत राहायचं, फलाची अपेक्षा करायची नाही. हे जरी आपल्याला पटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला जमत नाही. आपल्या प्रत्येकाकडून काहीतरी अपेक्षा असतातच. या बाबतीत आपण अगदी देवालासुद्धा सोडलं नाही. आपलं काही असेल तेव्हा माणसं देवाला नवस बोलतात. अगदी कसला उपवास करीन, तुझ्या दर्शनाला येईन, ओटी भरीन वगैरे वगैरे, पण एवढं माझं काम होऊ दे रे बाबा. आपलं काम देवानं करावं ही अपेक्षा असतेच. अगदी गीता सांगणार्या कृष्णालासुद्धा कोणी सोडलं नाही. राजस्थानात कृष्णाचं एक सुंदर मंदिर आहे. सट्टा जुगार खेळणारे तिथे भरपूर पैसा ओततात, पण सट्ट्यामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळू दे अशी अपेक्षा ठेवूनच. त्या कृष्णाचं नावच लोकांनी ठेवलंय ‘सटोडिया कृष्ण’!
अगदी साधं घरगुती उदाहरणच घ्या ना. घरात एखादी स्त्री म्हणजे आई, अगदी मनापासून स्वयंपाक करते. सगळ्यांना वाढते आणि साहजिकच तिची अपेक्षा असते की आपण केलेल्या पदार्थांची नवर्यानं, मुलांनी स्तुती करावी. वरवर जरी ती ते दाखवत नसली तरी मनात कुठेतरी ही सुप्त इच्छा असतेच. भाऊबहीण, नवरा बायको, आईवडील आणि मुलं या सगळ्यांची एकमेकांकडून कसली ना कसली तरी अपेक्षा असते. तसंच सामान्य माणसांच्या समाजाकडून, सरकारकडून अपेक्षा असतातच. पूर्वीच्या काळी नवर्यानं कधीतरी आपल्याबरोबर चार चांगले शब्द बोलावे एवढीच माफक अपेक्षा असायची बायकोची. पण आता काळ बदलला. बायका कमावत्या झाल्या, जास्त पॉवरफूल झाल्या. त्यामुळे घरातल्या प्रत्येक कामात नवर्यानं आपल्याला मदत करावी ही अपेक्षा असतेच आणि त्यात गैर काहीच नाही.
मुलांकडून आईवडलांच्याही काही अपेक्षा असतात. मुलांनी आपण केलेल्या कष्टाचं, कष्ट करून त्यांना शिक्षण, सगळ्या सुविधा देण्याचं चीज करावं. आपली चौकशी करावी. तोंडं वाकडी न करताना म्हातारपणी आपल्याला आधार द्यावा. पण आजकाल आईवडिलांकडूनही खूपसार्या अपेक्षा मुलं करतात. पण आईवडिलांनी आपल्याकडून काही अपेक्षा ठेवू नये असं म्हणणार्यांचं प्रमाण वाढतंय. इतकंच काय शाळेलासुद्धा विद्यार्थ्यांकडून बर्याच अपेक्षा असतात, विशेषतः हुशार मुलांच्याकडून तरी. आपल्या विद्यार्थ्यांनी बोर्डात नंबर मिळवावा, शाळेचं नाव वर काढावं. पण तसं झालं नाही तर शिक्षकांना वाटतं, अरे या मुलांच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती.
बरेच वेळा समाजाकडून, सरकारकडून आपल्या काही अपेक्षा असतात. तशा जनतेकडूनही समाजाच्या, सरकारच्या काही अपेक्षा असतात. आत्ताच बघा ना. स्वच्छता अभियान प्रत्येक गावागावात पंचायतीने सुरू केलंय. निदान आमच्या सांताक्रूझमध्ये तरी जिथे जिथे लोक कचरा टाकायचे, त्या जागा स्वच्छ केल्या. तिथे छान झाडांच्या कुंड्या ठेवल्या, काही ठिकाणी बाकही ठेवल्येत. आम्ही सांताक्रूझवासियांनी निःश्वास सोडला कारण पंचायतीकडून आमची हीच अपेक्षा होती. घरोघरी कचरा गोळा करायलाही सुरुवात केली आणि हे अभियान असंच चालू रहावं ही पंचायतीची अपेक्षा. पण आम्ही कसले सुधारतोय. त्या कुंड्यांच्या पुढे कचरा टाकायला सुरुवात केली आणि शिवाय कचरा टाकायच्या नवीन नवीन जागाही शोधून काढल्या आणि स्वच्छतेचे तीन तेरा वाजवले. सरकार आपल्याकडून अनेक प्रकारचे कर घेते. तेव्हा आपल्या गावाचा, आपल्या राज्याचा विकास करावा निदान पक्षी आपल्या कराच्या पैशाने कोणा नेत्याचे खिसे तरी भरले जाऊ नयेत ही आपली अपेक्षा असते. पण विकास तर सोडाच साधे रस्त्यावरचे खड्डेही सरकारला बुजवता येत नाहीत. म्हणजे आम्ही वेळेवर कर भरावेत ही सरकारची अपेक्षा असते पण जनतेच्या साध्या अपेक्षा सरकारकडून पूर्ण होत नाहीत. निवडणूक जवळ आली की सगळे उमेदवार आपल्याला लोकांनी भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी अपेक्षा बाळगतात. लोकांनी सगळ्या प्रकारचे टॅक्सेस वेळेवर भरावेत, सरकारने केलेल्या नियमांचे पालन करावे ही सरकारची अपेक्षा असते. पण मग जनतेच्या अपेक्षांचं काय?
मित्रमैत्रीणींच्यासुद्धा एकमेकांकडून खूप अपेक्षा असतात. कोणत्याही बर्यावाईट प्रसंगात आपल्या मित्रांनी किंवा मैत्रीणींना आपल्यासोबत असावं. आपल्या अडचणीच्या काळात आपल्याला मदत करावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की माणसं खूप दुःखी होतात. प्रत्येक माणसाला असंच वाटतं की गीतेतला उपदेश दुसर्यांसाठी आहे. स्वतःसाठी नाही.
एकूण काय प्रत्येक माणूस आयुष्यभर कोणत्या ना कोणत्यातरी अपेक्षांचं ओझं खांद्यावर वाहात असतो. समाज, सरकार आणि प्रत्येक माणसानं दुसर्याच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर माणसांचा अपेक्षाभंग कमी होईल आणि अपेक्षांचं ओझं कुणालाच खांद्यावर वाहावं लागणार नाही.