चेन्नई
कर्णधार तथा नायजेरियन खेळाडू बार्थोलेम्यू ओगबेचे याने नोंदविलेल्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने चेन्नईन एफसीला त्यांच्याच मैदानावर ४-३ अशा गोलफरकाने धक्का देत इंडियन सुपर लीगमध्ये पूर्ण गुणांची कमाई केली.
नेहरू स्टेडियमवर १४ हजार २९३ प्रेक्षकांच्या साक्षीने नॉर्थईस्टने चेन्नईनवरील वर्चस्वाची परंपरा कायम राखली. नॉर्थईस्टसाठी चेन्नईयीन हा कायम आवडता प्रतिस्पर्धी राहिला आहे. याचे कारण सात लढतींत नॉथईस्टने पाचवा विजय नोंदविला. नॉर्थईस्टचे सर्वांत कमी पराभव आणि सर्वाधिक गोल ज्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध झाले तो सुद्धा चेन्नईनच होय. नॉर्थईस्टने आयएसएल इतिहासात एका सामन्यात तीन किंवा जास्त गोल करण्याची कामगिरी पाचव्यांदा नोंदविली. यात चेन्नईनविरुद्ध त्यांनी चौथ्यांदा हा पराक्रम करून दाखविला.
नॉर्थईस्टने याचबरोबर गुणतक्त्यात आघाडी घेतली. त्यांनी तीन सामन्यांत दुसरा विजय मिळविला असून एका बरोबरीसह त्यांचे सर्वाधिक सात गुण झाले. चेन्नईनला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. सहभागी दहा संघांमध्ये अद्याप गुणांचेही खाते न उघडलेला चेन्नईन एकमेव संघ आहे. चेन्नईनला स्वयंगोलच्या मदतीमुळे खाते उघडता आले. मग थोई सिंगने दोन गोल करीत यजमान संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली होती. यानंतरही नॉर्थईस्टने दमदार खेळ केला.
चेन्नईनचे खाते सुदैवाने उघडले. इनिगो कॅल्डेरॉन याने डावीकडून मारलेला चेंडू हेड करण्यासाठी एली साबिया याने उडी घेतली. बचावासाठी बोर्जेस हा सुद्धा सरसावला, पण चेंडू त्याला लागून नेटमध्ये गेला. साबियाने गोलचा मानकरी असल्याचा दावा केला, पण हा गोल बोर्जेसचा स्वयंगोल असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात चेन्नईनच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
स्वयंगोलचा हादरा बसूनही नॉर्थईस्टने चढाया सुरु ठेवल्या. ११व्या मिनिटाला जेरी लालरीनझुला याने डावीकडून मुसंडी मारली असताना नॉर्थईस्टच्या मिस्लाव कोमोर्स्की याने त्याला रोखले. १५व्या मिनिटाला जेरीने डावीकडे इसाक वनमाल्साव्मा याला पास दिला. इसाकने बॉक्समधील थोईला अलगद पास दिला. थोईच्या हाललाचींचा अंदाज चुल्यामुळे पवनला आणि पर्यायाने नॉर्थईस्टला दुसरा गोल पत्करावा लागला.
१९व्या मिनिटाला कॅल्डेरॉनच्या पासवर कार्लोस सालोमने केेलेला गोल ऑफसाईड ठरला. तीन मिनिटांनी जेरीच्या चालीवर कार्लोसनेच नेटमध्ये चेंडू घालविल्यानंतरही ऑफसाईडचा इशारा झाला.
२९व्या मिनिटाला ओगबेचेने पहिला गोल नोंदविला. फेडेरिको गॅलेगोचा फटका डावीकडे साबियाने थोपविला, पण दोन प्रयत्नांतही तो चेंडूवर नियंत्रण राखू शकला नाही. ओगबेचेने त्याच्या ढिलाईचा फायदा उठवित करणजीतला चकविले.
थोईने ३२व्या मिनिटाला डावीकडून रफाएल आगुस्टोने रचलेली चाल सत्कारणी लावली. आगुस्टोने ज्योस लेयूडोला चकवित हा पास दिला होता. थोईचा पहिला फटका अचूक बसला नसतानाही करणजीतला चपळाई दाखविता आली नाही.
स्वयंगोलसह १-३ अशी पिछाडी कोणत्याही संघाला खचवू शकते, पण इशान्येकडील पहाडी भागातील नॉर्थईस्ट यास अपवाद ठरला. ३७व्या मिनिटास बोर्जेसने काही प्रमाणात भरपाई करीत ओगबेचेला पास दिला. ओगबेचेने चेस्टींगचे कौशल्य प्रदर्शित करीत चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि पहिल्या गोलप्रमाणेच करणजीतला चकविले.
ओगबेचेने मग दोन मिनिटांनी हॅट्ट्रीक साकार केली. त्यामुळे नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली. गॅलेगोने चाल रचताच अचूक अंदाज घेत ओगबेचेने डावीकडून टायमिंग साधत वेगाने घोडदौड केली आणि मोकळ्या नेटमध्ये चेंडू मारत जल्लोष केला.
उत्तरार्धात नॉर्थईस्टसाठी बोर्जेसने खर्या अर्थाने भरपाई केली. मैल्सन आल्वेसच्या ढिलाईमुळे अनिरुध थापाकडे चेंडू गेला. थापालाही बॉक्सजवळ नियंत्रण मिळविता आले नाही. याचा फायदा घेत बोर्जेसने ताकदवान फटका मारत चेंडू नेटच्या उजव्या कोपर्यात घालविला.
अंतिम टप्यात चेन्नईनचा ग्रेगरी नेल्सन, बदली खेळाडू अँड्रीया ओरलँडी यांचे प्रयत्न फसले.