>> लेगस्पिनर जॉर्जिया वॅरहेमचा प्रभावी मारा
लेगस्पिनर जॉर्जिया वॅरहेमच्या जादुई लेगस्पिन गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे कडवे आव्हान मोडून काढत महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १५५ धावांना उत्तर देताना किवी संघाला ७ बाद १५१ धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले.
न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आक्रमक सलामीवीर अलिसा हिली (९) बाद झाली त्यावेळी फलकावर केवळ २० धावा लागल्या होत्या. डावखुरी बेथ मूनी (६० धावा, ५० चेंडू, ६ चौकार, २ षटकार) व कर्णधार मेग लेनिंग (२१) यांनी दुसर्या गड्यासाठी ३२ धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी फुलत असतानाच लेनिंग बाद झाली. ऑफस्पिनर पीटरसनच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार लगावल्यानंतर तिसरा चेंडू स्वीप करण्याच्या नादात शॉर्ट फाईन लेगकडे सोपा झेल देत तिने तंबूची वाट धरली. ऍश्ले गार्डनरने यांनतर चेंडूगणिक धाव करत २० धावा जोडतानाच मूनीसह ५२ धावांची मौल्यवान भागी रचली. एलिस पेरी (१५ चेंडूंत २१) व राचेल हेन्स (८ चेंडूंत नाबाद १९) यांनी संघाला दीडशेपार नेले. न्यूझीलंडकडून ऍना पीटरसनने सर्वाधिक २ गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करताना रेचल प्रिस्ट व सोफी डिव्हाईन यांनी किवी संघाला २५ धावांची सलामी दिली. डावखुरी फिरकीपटू जेस जोनासनने प्रिस्टला पायचीत करत ही जोडी फोडली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार लेनिंगने गोलंदाजीतील तिसरा बदल म्हणून वापरलेली लेगस्पिनर जॉर्जिया वॅरहेम न्यूझीलंड संघासाठी कर्दनकाळ ठरली. आपल्या चार षटकांत केवळ १७ धावा देत तिने ३ गडी बाद केले. मध्यमगती गोलंदाज मेगन शूटने २८ धावांत ३ बळी घेत तिला चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून केटी मार्टिन्सने १८ चेंडूंत नाबाद ३७ धावा केल्या. परंतु, तिचा प्रतिकार कमी पडला. शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार व षटकार लगावल्याने पराभवाचे अंतर चार धावांपर्यंत मर्यादित राहिले. प्रमुख वेगवान गोलंदाज एलिस पेरीला जायबंदी झाल्यामुळे मैदान सोडावे लागले. तिने केवळ २ षटके गोलंदाजी केली.
‘सामनावीर’ शशिकला सिरीवर्धनेचा विजयी निरोप
श्रीलंकेची अष्टपैलू शशिकला सिरीवर्धने हिने आपल्या १७ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा समारोप काल बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने केला. शशिकलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७ बळी व ३१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकानंतर निवृत्त होण्याची घोषणा तिने काही महिन्यांपूर्वीच केली होती. सिरीवर्धनेने ४ षटकांत १६ धावा देत ४ गडी बाद केले. श्रीलंकेने हा सामना ९ गड्यांनी जिंकत स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सांगता विजयाने केली. बांगलादेशचा डाव ८ बाद ९१ धावांत रोखल्यानंतर श्रीलंकेने १५.३ षटकांत १ बाद ९२ धावा करत ‘अ’ गटातील शेवटचे स्थान टाळले. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशकडून निगार सुलताना हिने सर्वाधिक ३९ धावा केल्या. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना हसिनी परेरा (नाबाद ३९) कर्णधार चामरी अटापटू (३०) यांनी ५१ धावांची सलामी संघाला दिली. अनुष्का संजीवनी १६ धावा करून नाबाद राहिली.