>> टीम इंडियाचे उपविजेतेपदावर समाधान
ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियाचा ८५ धावांनी एकतर्फी पराभव करत टी-ट्वेंटी विश्वचषकावर पाचव्यांदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची डाळ शिजू दिली नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला २० षटकांत १८५ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताचा डाव १९.१ षटकांत अवघ्या ९९ धावांत आटोपला.
विजेतेपदाच्या या लढतीत मोठी धावसंख्या उभारून भारतावर दबाव टाकण्याच्या उद्देशाने यजमानांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हिली व मूनी या कांगारूंच्या सलामीवीरांनी कर्णधार लेनिंगचा विश्वास सार्थ ठरवला. वैयक्तिक ९ धावांवर शफालीने अलिसा हिलीचा ‘कव्हर्स’मध्ये सोपा झेल सोडला होता. यानंतर वैयक्तिक ८ धावांवर बेथ मूनीला झेलबाद करण्याची संधी राजेश्वरी गायकवाडने दवडली. त्यामुळे कांगारूंना पॉवरप्लेमध्ये बिनबाद ४९ धावा चोपता आल्या. हिलीने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आतापर्यंत झालेल्या पुरुषांच्या आणि महिलांच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. हिलीने ३९ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७५ धावा कुटल्या.
हिली बाद झाल्यावर बेथ मूनीनेही आक्रमक फलंदाजी केली आणि त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला धावपर्वत उभारता आला.
विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी ढेपाळली. भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी शफाली वर्मा डावाच्या तिसर्याच चेंडूवर दोन धावा काढून बाद झाली. त्यानंतर दुखापतग्रस्त (कन्कशन) तानिया भाटियाच्या जागी मैदानावर आलेली जेमिमा रॉड्रीग्स शून्यावर माघारी परतली. आधीच्या षटकात दोन चौकार लगावलेली स्मृती मंधानाचा खराब फॉर्म कायम राहिला. बेजबाबदार फटका खेळून ती वैयक्तिक ११ धावा करून बाद झाली. हरमनप्रीत कौर केवळ चार धावांचे योगदान देऊ शकली. दीप्ती शर्माने झुंज देत सर्वाधिक ३३ धावा केल्या. पण इतर फलंदाजांनी साफ निराशा केली. भारताचे तब्बल ६ फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मेगन शूटने ४ बळी टिपले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया ः अलिसा हिली झे. कृष्णमूर्ती गो. राधा ७५ (३९ चंेंडू, ७ चौकार, ५ षटकार), बेथ मूनी नाबाद ७८ (५४ चेेंडू, १० चौकार), मेग लेनिंग झे. पांडे गो. शर्मा १६, ऍश्ले गार्डनर यष्टिचीत भाटिया गो. शर्मा २, रेचल हेन्स त्रि. गो. पूनम ४, निकोला केरी नाबाद ५, अवांतर ४, एकूण २० षटकांत ४ बाद १८४
गोलंदाजी ः दीप्ती शर्मा ४-०-३८-२, शिखा पांडे ४-०-५२-०, राजेश्वरी गायकवाड ४-०-२९-०, पूनम यादव ४-०-३०-१, राधा यादव ४-०-३४-१
भारत ः शफाली वर्मा झे. हिली गो. शूट २, स्मृती मंधाना झे. केरी गो. मोलिनेक्स ११, तानिया भाटिया जखमी निवृत्त २, जेमिमा रॉड्रिग्स झे. केरी गो. जोनासन ०, हरमनप्रीत कौर झे. गार्डनर गो. जोनासन ४, दीप्ती शर्मा झे. मूनी गो. केरी ३३, वेदा कृष्णमूर्ती झे. जोनासन गो. किमिन्स १९, रिचा घोष झे. केरी गो. शूट १८, शिखा पांडे झे. मूनी गो. शूट २, राधा यादव झे. मूनी गो. जोनासन १, पूनम यादव झे. गार्डनर गो. शूट १, राजेश्वरी गायकवाड नाबाद १, अवांतर ५, एकूण १९.१ षटकांत सर्वबाद ९९
गोलंदाजी ः मेगन शूट ३.१-०-१८-४, जेस जोनासन ४-०-२०-३, सोफी मोलिनेक्स ४-०-२१-१, डेलिसा किमिन्स ४-०-१७-१, निकोला केरी ४-०-२३-१.