कर्णधार मिले जेडीनाकने पेनल्टीवर नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने डेन्मार्कला १-१ असे बरोबरीत रोखत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील क गटातील सामन्यात गुण विभागून घेतला. डेन्मार्कच्या एरिकसनची सामानवीर पुरस्कारासाठी निवड झाली.
प्रारंभापासूनच डेन्मार्कने आक्रमक पवित्रा अवलंबिला होता आणि त्यात त्यांना ७व्या मिनिटाला यश आले. मध्यपटू ख्रिस्तियान एरिकसनने जॉगरसनच्या अचूक पासवर चेंडूला जाळीची दिशा दाखवित डेन्मार्कला आघाडीवर नेणारा हा गोल नोंदविला. प्रारंभीच लादल्या गेलेल्या गोलमुळे ऑस्ट्रेलियन संघ काहीसा बॅकफूटवर फेकला गेला. परंतु त्यांनी एका गोलाच्या पिछाडीनंतर जोरदार उभारी मारताना ३८व्या मिनिटाला बरोबरी साधण्यात यश मिळविले. डेन्मार्कच्या खेळाडूे डी कक्षेत केलेल्या चुकीमुळे ऑस्ट्रेलियाला रेफ्रीने पेनल्टी बहाल केली. या संधीचे सोने करत कर्णधार मिले जेडीनाकने डेनमार्कच्या गोलरक्षकाला चकवित संघाला सामन्यात १-१ अशी बरोबरी साधून दिली.
बरोबरीमुळे डेन्मार्कचे ४ गुण झाले असून क गटात त्यांनी अव्वल स्थान मिळविले आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ १ गुणासह तिसर्या स्थानी आहेे.