ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर मात

0
56

दिवसरात्र कसोटी सामन्यात इंग्लंडवर १२० धावांनी विजय मिळवून यजमान ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. काल शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी १७८ धावांची आवश्यकता होती व त्यांचे ६ गडी शिल्लक होते. परंतु, हेझलवूडने ऑस्ट्रेलियाच्या विजयातील प्रमुख अडसर असलेल्या इंग्लंडच्या ज्यो रुट (६७) याला सुरुवातीलाच बाद करत संघाला विजयासमीप नेले. चौथ्या दिवसाच्या आपल्या धावसंख्येत रुटला एकाही धावेची भर घालता आली नाही. काल नाबाद असलेला वोक्सदेखील फारकाळ तग धरू शकला नाही. जॉनी बॅअरस्टोव (३६) याने तळाला थोडाफार प्रतिकार केला. परंतु, दुसर्‍या टोकाने त्याला योग्य साथ लाभली नाही. त्यांचा संपू्‌र्ण डाव २३३ धावांत संपला. ऑस्ट्रेलियाकडून दुसर्‍या डावात मिचेल स्टार्कने ८८ धावांत ५, जॉश हेझलवूडने ४५ धावांत २ तर कमिन्सने १ गडी बाद केला. पहिल्या डावात १२६ धावांची झुंजार खेळी केलेला शॉन मार्श सामनावीर किताबाचा मानकरी ठरला. तिसरा कसोटी सामना १४ डिसेंबरपासून पर्थ येथे होणार आहे.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ८ बाद ४४२ घोषित, इंग्लंड पहिला डाव सर्वबाद २२७, ऑस्ट्रेलिया दुसरा डाव सर्वबाद १३८
इंग्लंड दुसरा डाव ः (४ बाद १७६ वरून)ः रुट झे. पेन गो. हेझलवूड ६७, वोक्स झे. पेन गो. हेझलवूड ५, अली पायचीत गो. लायन २, बॅअरस्टोव त्रि. गो. स्टार्क ३६, ओव्हर्टन पायचीत गो. स्टार्क ७, ब्रॉड झे. पेन गो. स्टार्क ८, अँडरसन नाबाद ०, अवांतर १२, एकूण ८४.२ षटकांत सर्वबाद २३३
गोलंदाजी ः स्टार्क ८८-५, हेझलवूड ४९-२, कमिन्स ३९-१, लायन ४५-२