ऑस्ट्रेलियाचा विश्‍वविक्रमी पाठलाग

0
89

>> टी-२० मध्ये २४३ धावांचा बचाव करण्यात न्यूझीलंडला अपयश

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाने काल शुक्रवारी नव्या विश्वविक्रमाची नोंद करताना ऑकलंडच्या ईडन पार्क स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या २४४ धावांचे आव्हान ७ चेंडू राखत पूर्ण केले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया हा टी-२० मध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर मार्टिन गप्टिलने अवघ्या ५४ चेंडूत १०५ धावांची धमाकेदार खेळी केली. गप्टिलला त्याचा सलामीवीर साथीदार कॉलिन मन्रोने ७६ धावा काढत उत्तम साथ दिली. मन्रोने केवळ ३३ चेंडूंचा सामना करत ६ चौकार व ६ षटकांरसह आपली खेळी सजवली. या द्वयीने १३२ धावांची सलामी दिली.

२४५ धावांच्या विशाल लक्ष्यचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला दमदार सलामीची आवश्यकता होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि डार्सी शॉर्ट यांनी कांगारुंना निराश केले नाही. सामनावीर शॉर्टने ४४ चेंडूंत ७६ तर वॉर्नरने २४ चेंडूंत ५९ धावा झोडपून केवळ ८.३ षटकांत कांगारूंना १२१ धावांची घणाघाती सलामी दिली. शॉर्ट बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र ऍरोन फिंचने (१४ चेंडूंत नाबाद ३६) फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ग्लेन मॅक्सवेलने १४ चेंडूंत ३१ धावा जमवून आपले योगदान दिले. न्यूझीलंड व इंग्लंड यांच्यात रविवारी शेवटचा साखळी सामना होणार असून या सामन्यातील विजेता बुधवार २१ रोजी होणार्‍या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळेल.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. मॅक्सवेल गो. टाय १०५, कॉलिन मन्रो झे. मॅक्सवेल गो. टाय ७६, टिम सायफर्ट झे. फिंच गो. एगार १२, मार्क चॅपमन स्वयंचित गो. स्टेनलेक १६, कॉलिन डी ग्रँडहोम त्रि. गो. रिचर्डसन ३, रॉस टेलर नाबाद १७, केन विल्यमसन झे. टाय गो. रिचर्डसन १, बेन व्हीलर नाबाद १, अवांतर १२, एकूण २० षटकांत ६ बाद २४३
गोलंदाजी ः केन रिचर्डसन ४-०-४०-२, बिली स्टेनलेक ४-०-४३-१, अँडी टाय ४-०-६४-२, मार्कुस स्टोईनिस ४-०-५०-०, ऍश्टन एगार ३-०-२४-१, डार्सी शॉर्ट १-०-१९-०. ऑस्ट्रेलिया ः डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. सोधी ५९, डार्सी शॉर्ट झे. सायफर्ट गो. बोल्ट ७६, ख्रिस लिन झे. गप्टिल गो. ग्रँडहोम १८, ग्लेन मॅक्सवेल त्रि. गो. साऊथी ३१, ऍरोन फिंच नाबाद ३६, मार्कुस स्टोईनिस धावबाद ४, आलेक्स कॅरी नाबाद १, अवांतर २०,एकूण १८.५ षटकांत ५ बाद २४५
गोलंदाजी ःट्रेंट बोल्ट ३.५-०-४२-१, बेन व्हीलर ३.१-०-६४-०, टिम साऊथी ४-०-४८-१, ईश सोधी ४-०-३५-१, कॉलिन डी ग्रँडहोम ३.५-०-५६-१

सामन्यात नोंद झालेले विक्रम
* आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने केला. न्यूझीलंडने विजयासाठी २४४ धावांचे लक्ष्य ठेवलेले असताना ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत ५ गडी गमावून २४५ धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम विंडीजच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (७ बाद २३१) यशस्वी पाठलाग करताना विंडीजने ६ बाद २३६ धावांची नोंद केली होती.

* न्यूझीलंडचा गोलंदाज बेन व्हीलर याने आपल्या ३.१ षटकांत ६४ धावा दिल्या. कमरेवरील दोन चेंडू टाकल्याने त्याची गोलंदाजी बंद करावी लागली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील ही संयुक्तपणे तिसर्‍या क्रमांकाची सर्वांत खराब गोलंदाजी ठरली. सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम आयर्लंडच्या बॅन मॅकार्थीच्या नावावर आहे. मॅकार्थीने अफगाणविरुद्घ ४ षटकांत ६९ धावांची खैरात केली होती. ६८ धावांसह दक्षिण आफ्रिकेचा काईल ऍबॉट दुसर्‍या तर प्रत्येकी ६४ धावांसह जयसूर्या, अँडरसन व टाय तिसर्‍या क्रमांकावर आहेत.

* न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया लढतीत एकूण ४८८ धावांची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय टी-२०च्या इतिहासातील या दुसर्‍या क्रमांकाच्या धावा आहेत. भारत-वेस्ट इंडीज यांच्यात २०१६ साली लॉंडरहिल येथील लढतीत ४८९ धावा करण्यात आल्या होत्या.
* एकूण ३२ षटकारांची नोंद या लढतीत झाली. भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील लढतीतही षटकारांच्या समान संख्येची नोंद झाली होती. आंतरराष्ट्रीय टी-२०च्या इतिहासात ही संयुक्त सर्वाधिक संख्या आहे.

गप्टिलने टाकले मॅक्कलमला मागे
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम काल न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल याने आपल्या नावे केला. त्याने काल आपल्या १०५ धावांच्या खेळी दरम्यान आपला माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्कलम याला मागे टाकले. मॅक्कलमच्या नावावर ७१ सामन्यांत २१४० धावांची नोंद आहे. गप्टिलच्या नावावर ७३ सामन्यांत २१८८ धावा झाल्या आहेत. गप्टिलने काल ४९ चेंडूंत अर्धशतक ठोकून न्यूझीलंडतर्फे सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मॅक्कलमचा (५० चेंडू) विक्रम मोडला. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहली १९५६ धावांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.