>> तिसरी कसोटी डाव व ४८ धावांनी जिंकली
नाथन लियॉनने दुसर्या डावात मिळविलेल्या पाच बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्या कसोटीत डाव व ४८ धावांनी विजय मिळवित पाकिस्तानचा ‘व्हॉईटवॉश’ केला. ३ लढतींची ही कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकत जिंकली.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना आपला पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात ६ बाद ९६ अशा बिकट स्थितीनंतर सर्वबाद ३०२ धावांपर्यंत मजल मारली होती. तर फॉलोऑननंतर दुसर्या डावात तिसर्या दिवसअखेर त्यांची स्थिती ३ बाद ३९ अशी पुन्हा बिकट झाली होती.
दिवस-रात्र खेळविण्यात आलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी नाथन लियॉनच्या जादुई गोलंदाजीपुढे पाकिस्तानी फलंदाजांनी शरणागती पत्करल्याने त्यांचा दुसरा डावही २३९ धावांवर संपुष्टात आला आणि ऑस्ट्रेलियाने हा सामना डाव व ४८ धावांनी जिंकला. काल चौथ्या दिवशी पुढे खेळताना शानदार अर्धशतकी खेळी करत शान मसूद व असद शफीक यांनी चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी करीत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ऑफस्पिनर नाथन लियॉनने ही जमलेली जोडी फोडत ऑस्ट्रेलियाला महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले. त्याने ६८ धावांची अर्धशतकी खेळी केलेल्या मसूदला स्टार्ककरवी झेलबाद केले. त्यानंतर लगेच शफीकही ५७ धावा जोडून नाथनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मसूद-शफीक तंबूत परतल्यानंतर इफ्तिखार अहमद (२७) आणि मोहम्मद रिजवान (४५) यांनी संघाला डावाच्या पराभवातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना सहाव्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. परंतु हे दोघे माघारी परतल्यानंतर पाकिस्तानचा डाव झटपट संपुष्टात आला. आफ्रिकेकडून नाथन लियॉनने ६९ धावांत ५, हेझलवूडने ६३ धावांत ३ तर मिचेल स्टार्कने १ गडी बाद केला.