>> केपटाऊनमधील बॉल टॅम्परिंग प्रकरणी आयसीसीची कारवाइ
येथे खेळल्या जाणार्या द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड केल्याबद्दल (बॉल टॅम्परिंग) इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल तथा आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव स्मिथ याला एका कसोटीतील निलंबनासह कसोटी सामन्याच्या पूर्ण मानधनाचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणातील अन्य एक खेळाडू कॅमरून बँक्रॉफ्ट यालाही ७५ टक्के मानधनाचा दंड ठोठावला आहे. या गुन्ह्याची स्टिव स्मिथ याने कबुली दिली असून या घटनेमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही आपल्या खेळाडूंप्रती नाराजी व्यक्त केली आहे.
केपटाऊन कसोटीच्या तिसर्या दिवशी म्हणजे शनिवारी ही चेंडू छेडछाडीची घटना घडली. कॅमरुन बँक्रॉफ्ट याने आपल्या गोलंदाजांना फायदा होण्यासाठी चेंडूला टेप लावून छेडछाड केली व टेप आपल्या पँटमध्ये लपवली. त्याची ही कृती टीव्ही प्रक्षेपणात उघडी पडली. या घटनेनंतरच्या पत्रकार परिषदेत कर्णधार स्टिव स्मिथ याने या कृत्याची कबुली दिली. फायदा उठविण्यासाठी आपल्या संघाची ही योजना होती असे त्याने यावेळी सांगितले. त्यानुसार हे काम फलंदाज कॅमरून बँक्रॉफ्ट याने केल्याचे तो म्हणाला.
आयसीसीच्या मार्गदर्शक नियमावलीच्या कलमांखाली वरील खेळाडूंवर कारवाई केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डस्न यांनी जाहीर केले आहे. अशा गंभीर कृत्याची पूर्ण जबाबदारी कर्णधाराने घ्यायची असल्याने स्मिथवर कारवाई केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने स्मिथला निलंबित करण्याचा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले.
अलीकडील काही दिवसात आम्ही खेळाडू पंचाच्या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणे, प्रतिस्पर्धी खेळाडूंना शेरेबाजी करणे व अन्य आक्षेपार्ह बाबी करताना पाहिले आहे. त्यामुळे खेळाच्या प्रतिष्ठेसाठी अशा कारवाईची गरज असल्याचे डेव्हिडस्न यांनी सांगितले.