पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन; ‘आयएनएस विक्रांत’वर नौसैनिकांसमवेत दिवाळी साजरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची ही 12 वी वेळ आहे. ‘ऑपरेशन सिंदूरमध्ये तिन्ही सैन्य दलांतील प्रचंड समन्वयामुळे पाकिस्तानला शरणागती पत्करणे भाग पडले. आज, आयएनएस विक्रांतच्या शौर्यस्थळावरून, मी पुन्हा एकदा तिन्ही दलांच्या सैनिकांना सलाम करतो. जेव्हा शत्रू उपस्थित असतो, जेव्हा युद्ध जवळ येते, तेव्हा ज्या देशाकडे स्वतःहून युद्ध लढण्याची ताकद असते तोच देश वरचढ ठरतो. आयएनएस विक्रांतच्या नावानेच पाकची झोप उडाली होती. आयएनएस विक्रांत हे असे जहाज आहे, ज्याच्या नावानेच शत्रू मोडून पडतो, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करताना सशस्त्र दलाच्या जवानांना संबोधित केले. भारतीय नौदलाच्या शूर जवानांसोबत ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणे हा आपला बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले.
मी काल (रविवार)पासून तुमच्यासोबत आहे. तुमच्या प्रत्येकाकडून मी काहीतरी शिकलो आहे. अथांग समुद्रातील रात्र आणि सूर्योदयाने माझी दिवाळी अनेक प्रकारे खास बनवली आहे. हा अनुभव शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, असे आयएनएस विक्रांतवर घालवलेल्या त्यांच्या रात्रीची आठवण सांगताना पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील सर्व 140 कोटी नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ज्या दिवशी देशाला स्वदेशी आयएनएस विक्रांत मिळाली, त्या दिवशी नौदलाने गुलामगिरीचे एक प्रमुख प्रतीक सोडून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने नौदलाने एक नवीन ध्वज स्वीकारला. आज, आपली युद्धनौका विक्रांत स्वावलंबी भारत आणि मेड इन इंडियाचे एक प्रमुख प्रतीक आहे. समुद्रातून जाणारी स्वदेशी आयएनएस विक्रांत भारताच्या लष्करी क्षमतेचे प्रतिबिंब आहे. विक्रांतने अलीकडेच पाकिस्तानची रात्रीची झोप उडवली. आयएनएस विक्रांत हे असे नाव आहे ज्याचे नावच शत्रूची शांती हिरावून घेऊ शकते, असे पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
नौदलाने परदेशात अडकलेल्या लोकांना वाचवले आपल्या नौदलाने परदेशात अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी मोहिमा सुरू केल्या. तुमच्या शौर्य आणि धाडसामुळे जगभरातील भारतीयांचा आत्मविश्वास बळकट झाला आहे. आपल्या सशस्त्र दलांनी जमिनीवर, समुद्रात आणि हवेत, प्रत्येक परिस्थितीत अत्यंत संवेदनशीलतेने सेवा दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, गेल्या वर्षी पंतप्रधानांनी गुजरातमधील कच्छला भेट दिली होती, जिथे त्यांनी बीएसएफ, लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांना मिठाई वाटली होती. गेल्या 11 वर्षांत, पंतप्रधानांनी दिवाळीसाठी जम्मू-काश्मीरला सर्वाधिक चार वेळा भेट दिली आहे.