ऑनलाइन फसवणूकप्रकरणी दोन संशयित गुन्हेगार ताब्यात

0
2

>> संशयित राजस्थान व पश्चिम बंगालमधील

गेल्या मे महिन्यात झालेल्या दोन ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा (सायबर क्राईम) छडा गोव्यातील सायबर गुन्हे पोलिसांनी लावला असून या प्रकरणी दोघा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक करून 21 लाख 15 हजार व 7 लाख 69 हजार रुपये लांबवणाऱ्या अनुक्रमे राजस्थान व पश्चिम बंगाल येथील दोघा गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे. या दोन्ही प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

सायबर भामट्यांनी बार्देश तालुक्यातील एका इसमाला 21 लाख 15 हजार रुपयांना गंडा घातला होता. आरोपींनी आपण मुंबई पोलीस असल्याचे भासवत तक्रारदाराला तो मनी लॉडरिंग व अमली पदार्थात गुंतल्याचा आरोप करून आर्थिक चौकशीच्या नावाखाली त्याला स्टेट बँकेच्या दोन खात्यांत एकूण 21 लाख 15 रु. जमा करण्यास भाग पाडले होते. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील राम निवास याला अटक करून त्याच्याकडून मोबाईल फोन, पासबूक व एटीएम कार्ड हस्तगत केले आहे.

दाबोळी येथील एका व्यक्तीने तक्रार केली होती की आपल्या नावे आलेल्या एका पार्सलची चौकशी केली जात असल्याचे सांगून स्वत:ला मुंबई पोलीस म्हणणाऱ्या भामट्याने आपणाला आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात 7 लाख 69 हजार रु. भरण्यास सांगितले होते. याप्रकरणी पोलिसांनी कोलकाता येथील अमृतदास याला अटक केली आहे.